आशिया खंडात नावलौकिकासाठी अमरावती विद्यापीठाची धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 08:01 PM2018-06-26T20:01:13+5:302018-06-26T20:01:27+5:30
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने बृहत आराखडा तयार केला असून, आशिया खंडात नावलौकिक मिळण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.
अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने बृहत आराखडा तयार केला असून, आशिया खंडात नावलौकिक मिळण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. राष्ट्रीय क्रमवारीत विद्यापीठ कसे येईल, याबाबत विद्यार्थी केंद्रित सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची सभा मंगळवारी पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य एफ.सी. रघुवंशी, दिनेश सूर्यवंशी, स्मीता देशमुख, ए.बी.मराठे, मनीषा काळे, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक जयंत वडते आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करताना नव्या महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला. शासनाचे मार्गदर्शक तत्त्वे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यापूर्वी विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करताना पारंपरिक, वैचारिक महाविद्यालयांची स्थापना व्हायची. मात्र, आता ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ महाविद्यालयांची स्थापन केली जाईल. ‘अर्न अॅन्ड लर्न’ ही तत्त्वे स्वीकारली आहे. नवीन संस्था अथवा महाविद्यालयांना मान्यता प्रदान करताना उद्योग, रोजगार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन, उद्योगधंद्यांना पूरक अभ्यासक्रम, कौशल्य विकास, पारंपरिक भारतीय खेळांचे जतन, सांस्कृतिक वारसा, विद्यार्थी कल्याण योजना, ग्लोबलायझेशन, समाजकारण ते राजकारण, उद्योगासाठी महाविद्यालये, रोजगारभिमुख अभ्यासक्रम आदी बाबींना स्थान देण्यात आले आहे. मुलींच्या उच्च शिक्षणाची काळजी घेताना तालुकास्तरावर महाविद्यालयाची स्थापना, उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळ हे निश्चित केले जाणार आहे. मास्टर प्लॅनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधनाला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक नोंद असलेला बृहतआराखडा तयार करण्यात आला आहे. ‘नॅक’च्या पुढे आता ‘एनआरएस’ क्रमवारीत नाव येण्यासाठी अमरावती विद्यापीठाने वाटचाल सुरू केली आहे.
पारंपरिक भारतीय खेळाचे केंद्र सुरू होणार
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पारंपरिक भारतीय खेळाचे केंद्र सुरू करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिल्याची माहिती दिनेश सूर्यवंशी यांनी दिली. युनोच्या ठरावानुसार पारंपरिक खेळाचे जतन करण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने अमरावती विद्यापीठात भारतीय खेळाचे स्वतंत्र केंद्र सुरू होईल, असे सूर्यवंशी म्हणाले.
उद्योग, रोजगारभिमुख शिक्षण हे बृहतआराखड्याचा आत्मा आहे. सांस्कृतिक वारसाचे जतन, आंतरराष्ट्रीय स्तराचे संशोधन, शिका आणि कमवा, राष्ट्रीय स्तराचे अभ्यासक्रम आदी महत्त्वाच्या बाबीचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात आशिया खंडात अमरावती विद्यापीठाचे नाव गौरविले जाईल.
- मुरलीधर चांदेकर,
कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ