अमरावती विद्यापीठाच्या पहिल्याच ‘डी. लिट’ला ग्रहण, मीनल ठाकरे यांची कुलपतींंकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 05:34 PM2018-02-20T17:34:06+5:302018-02-20T17:34:53+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्राचार्य भूजंग उर्फ संतोष ठाकरे यांना महानुभाव दर्शनासाठी ‘डी.लिट’ देण्याचा निर्णय घेतला असून, ही सर्वोच्च पदवी गैरकायदेशीर बाबीचा वापर करून त्यांनी मिळविली आहे. परिणामी शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी होणा-या दीक्षांत समारंभात ही ‘डी.लिट’ ठाकरेंना प्रदान करू नये, अशी तक्रार विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य मीनल ठाकरे (भोंडे) यांनी कुलपतींकडे केली आहे.
विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मीनल ठाकरे यांनी १८ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात तक्रार पाठविली आहे. विशेषत: यातक्रारीत तत्कालीन कुलगुरुंनी ‘डी.लिट’बाबत व्यवस्थित प्रक्रिया हाताळली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावेळी नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. अतिशय तडकाफडकी ‘डी.लिट’ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. पदवीसाठी जे संशोधन करण्यात आले ते संशयास्पद असून याबाबतची संपूर्ण प्रक्रिया सदोष असल्याचा संशय मीनल ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी संतोष ठाकरे यांच्याविरुद्ध स्वत:च्या भावाच्या पत्नीच्या गुणवाढ आरोपावरून त्यांना विद्यापीठातून बडतर्फ करण्यात आले होते, असे मीनल ठाकरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात सामूहिक तक्रार नोंदविली होती, हे विशेष. संतोष ठाकरे यांना प्राचार्य पदाहून बडतर्फ करण्यात आले करण्यात आले होते. अशी सर्व प्रकरणे आणि आपल्या पदाचा वेळोवेळी गैरवापर करणारी व्यक्ती प्रचंड दशहत आणि शिताफीने आपल्या गैरकायदेशीर बाबी कायदेशीर करून घेत असताना अशा व्यक्तिला विद्यापीठातील सर्वोच्च पदवी बहाल केली जात असेल तर ही बाब खेदजनक आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करावी, चौकशी होईस्तोवर ‘डी.लिट’ प्रदान करू नये, अशी मागणी मीनल ठाकरे यांनी कुलपतींकडे केली आहे. यासंदर्भात तक्रारीची प्रत विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु यांच्याकडेदेखील पाठविण्यात आली आहे.
मीनल ठाकरे यांनी माहितीच्या अधिकारातून संतोष ठाकरे यांच्या ‘डी.लिट’ संदर्भात कागदपत्रे मागितली असून ती त्यांना दिले जातील. मात्र, संतोष ठाकरे यांना ‘डी.लिट.’ देण्यासंदर्भात ८ महिन्यांपूर्वीच अधिसूचना निर्गमित झाली आहे. ही पदवी नियमानुसार दिली जात असून दीक्षांत समारंभात त्यांना प्रदान केली जाईल.
- मुरलीधर चांदेकर,
कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
मी खुश आहे. ज्या वर्तमानपत्राने मला ‘डी.लिट’ दिली जाते, हे वृत्त प्रकाशित केले आहे, तक्रार राज्यपालांकडे आहे. या तक्र ारीवर विद्यापीठ प्रशासन योग्य ते सोपस्कार करतील आणि त्यांनी करावेतही.
- संतोष ठाकरे,
प्राचार्य, गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर