अमरावतीत शिक्षणमंत्र्यांच्या संवादसभेत विसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 09:02 PM2019-01-04T21:02:35+5:302019-01-04T21:03:44+5:30
विनोद तावडे संतापले : प्राचार्य संतोष ठाकरे नाराज होऊन पडले बाहेर
अमरावती : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे अमरावती येथे शैक्षणिक संस्थाध्यक्ष, सचिवांच्या संवादसभेत शुक्रवारी चांगलेच संतापले. सिनेट सदस्य तथा प्राचार्य संतोष ठाकरे यांना ‘ऐकून घ्यायचे नसेल तर चला बाहेर जा’ अशी भूमिका त्यांनी घेतल्याने संवाद सभेला विसंवादाचे स्वरूप आले होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या शैक्षणिक संस्थाचालकांची संवाद सभा पार पडली. दरम्यान, प्राचार्य ठाकरे हे शिष्यवृत्ती विषयांवर काही मुद्दे मांडत होते. मात्र, शिक्षणमंत्र्यांनी त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतले नाही. त्यामुळे ठाकरे संतापले, ऐकून घ्यायचे नसेल तर कशाला बोलावले. अन्यथा मी बाहेर जातो, असे ते शिक्षणमंत्र्यांना अनुसरून म्हणाले. तेव्हा शिक्षणमंत्री ‘हे कोण? ‘जास्त आवाज चढवून बोलू नका, ऐकायचे नसेल तर चला बाहेर जा,’ असे म्हटले. दरम्यान शिक्षणमंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडून संतोष ठाकरे यांचा हात धरून खुर्चीवर बसविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी ठाकरे यांनी ‘तू कोण रे हात दाबणारा’ असे म्हणत स्वीय सहायकाला दूर लोटले. यावेळी या दोघांत ‘तू-तू, मै-मै’ झाली. त्यानंतर संतोष ठाकरे हे सभागृहात बाहेर पडले. या सर्व घटनाक्रमातून संवाद सभेचे वातावरण सून्न झाले होते.
संवाद सभेत कुलगुरू मुरलीधर चांदेकर, व्यवस्थापन परिषदेचे दिनेश सूर्यवंशी, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, तंत्रशिक्षण सहसंचालक डी.व्ही. जाधव, कुलसचिव अजय देशमुख आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक संस्था चालकांद्वारा वसंतराव घुईखेडकर, हर्षवर्धन देशमुख, दीपक धोटे, श्रीकृष्ण अमरावतीकर, कांचनमाला गावंडे, माधुरी चेंडके, ज्ञानेभर पाटील, दिवाकर पांडे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या पुढ्यात काही विषय मांडले.