Amravati Violence : अचलपूरमध्ये दोन गटात दगडफेक, ३० जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 03:20 PM2022-04-18T15:20:37+5:302022-04-18T16:09:31+5:30
अचलपूर शहरात रविवारी रात्री ९.३० वाजतादरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला.
नरेंद्र जावरे /संतोष ठाकूर
परतवाडा /अचलपूर( अमरावती) : अचलपूर शहरातील दुल्हा गेट येथे रविवारी रात्री झेंडा वरून उफाळलेल्या वादात पोलिसांनी विविध गुन्हे दाखल केले असून सोमवारी दुपारपर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात संचारबंदी लागू असून शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आली आहे. या भागाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ताब्यात घेतले आहे.
सध्या येथे अतिरिक्त पोलीस कुमक तैनात असून वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ ठोकून आहेत. या घटनेत दोन्ही गटातील नागरिक आमने-सामने आल्याने दगडफेक झाली, त्यात पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या व लाठीचार्ज केला. दरम्यान, चारचाकी वाहनासह तोडफोड तर चांदूरबाजार नाक्यावरील एक दुकान जाळण्यात आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविल्याने मोठा अनर्थ टळला, शहरात सध्या शांतता आहे.
काय आहे प्रकरण?
अचलपूर शहरातील दुल्ल गेट परिसरात अचलपूरात काल झेंडा काढण्याच्या वादावरून दोन गटांमध्ये राडा झाला. एका गटाने हा झेंडा लावला तर पूर्वी तेथे झेंडा नसल्याने दुसऱ्या समाजाने याला विरोध दर्शविला व तो झेंडा काढला. त्यावरून काही युवक तोंडाला दुपट्टा बांधून तेथे आले. दरम्यान अचानक त्याचवेळेस नमाज सुटल्याने मोठा जमाव एकमेकांकडे पुढे धडकला. अचलपूर, परतवाडा, सरमसपुरा येथील पोलीस अधिकारी व मोजक्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हे गंभीर स्थिती मोठ्या शिताफीने हाताळली.
याप्रकरणी अचलपूर पोलिसात वेगवेगळ्या तीन फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस महा निरीक्षक चंद्रशेखर मीना, उपअधीक्षक शशिकांत सातव तळ ठोकून आहेत. एस डी पी ओ अतुल नवगिरे ठाणेदार माधव गरुड संतोष ताले या विभागाचे सुदर्शन झोड, सुधीर काळे, पुरुषोत्तम बावणेर व परिसरातील इतर ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
शिवराय कुलकर्णी, निवेदिता चौधरी ताब्यात
अमरावती येथून अचलपूर शहरातील परिस्थिती पाहण्यासाठी व भाजप कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलेले प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी व जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांना पोलिसांनी अचलपूर नाक्यावर अडवून ताब्यात घेतले व आसेगाव पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
धरपकड मोहीम रात्रभर
दगडफेक करून पळ काढणाऱ्या आरोपींची धरपकड मोहीम पोलिसांनी रात्रभर चालविली. सोमवारी दुपारपर्यंत दोन्ही गटातील जवळपास ३० जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. आरोपींविरुद्ध पोलिसांनी तीन वेगवेगळ्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून भांदवी १४३, १३५, १४८, १४९, ३५३, ३३२, १८६ सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रात्री व दिवसासुद्धा ही धरपकड मोहीम सुरू होती.
ऑटो, चारचाकीची, तोडफोड दुकान जाळले
दगडफेक करण्यासोबतच काही युवकांनी एका चारचाकी वाहनासह ऑटोची तोडफोड केली. चांदूरबाजार नाका येथील फळ विक्रेता चे दुकान रात्रीतून जाळण्यात आले. दुल्ला गेट परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने विटांचा चोरा रस्त्यावर पडलेला होता.
संचारबंदी, बाजारपेठा कार्यालय सर्व बंद
अचलपूर परतवाडा शहरासह देवमाळी कांडली व लगतच्या भागात अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केल्याने सर्व व्यवहार दुकाना व्यवसायिक एक प्रतिष्ठाने बाजारपेठ शासकीय कार्यालये शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दगडफेक दोन पोलीस कर्मचारी जखमी
परस्पर विरोधी झालेल्या दगडफेकीत घटनास्थळी बंदोबस्त करण्यासाठी आलेले दोन पोलीस कर्मचारी यांच्या पायाला व पाठीवर दगड लागल्याने जखमी झाले आहे. शेकडोंच्या संख्येने परस्परविरोधी जमाव एकमेकावर धडकत असताना पोलिसांनी परिस्थिती अत्यंत शेतीला देणे हाताळली अश्रुधुराच्या नळकांड्या व लाठीचार्ज केल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.