Amravati | आदर्श कोगे मृत्यूप्रकरणी वार्डनसह तिघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 06:27 PM2022-08-05T18:27:38+5:302022-08-05T18:30:21+5:30
आदर्श वसतिगृहात मृतावस्थेत आढळला होता. आपल्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून, तो घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप नीतेश कोगे यांनी केला होता.
अमरावती : रामपुरी कॅम्प, पत्रकार कॉलनीस्थित विद्याभारती वस्तीगृहातील आदर्श कोगे या सातवीतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी तेथील वार्डनसह रखवालदार व मदतनीसाला अटक करण्यात आली. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१८ च्या कलम ७५ नुसार तिघांनाही अटक करण्यात आल्यानंतर त्या तिघांना शुकवारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गृहपाल रवींद्र पांडुरंग तिखाडे, रखवालदार ओमप्रकाश रामाजी चकधरे व मदतनीस विकास बटुसिंह राजपूत अशी अटक आरोपींची नावे आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमाची अंमलबजावणी करताना तिघांनीही हाराकिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जुवेनाईल ॲक्टमधील तरतुदींचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.
शवविच्छेदन अहवाल व आदर्शच्या वडिलांच्या तक्रारीवरून आदर्श कोगे याच्या मृत्यूप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी रवींद्र तिखाडे यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, घटनेच्या १४ दिवसानंतरही आदर्शच्या खुनाचा उलगडा झाला नाही. त्यामुळे तिघाडे हा केवळ चौकशीपुरता ताब्यात होता. तर, उपायुक्त एम. एम. मकानदार, सहायक आयुक्त पुनम पाटील, गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी सुक्ष्म तपास केला. अनेकांची बयाने नोंदविली. मात्र, आदर्शचा गळा, नाक नेमके कुणी दाबले, त्याचा उलगडा झाला नाही.
पोलिसांनी मागितली होती समाजकल्याणला माहिती
विद्याभारती वसतिगृहाबाबत गाडगेनगर एसीपी पुनम पाटील यांनी समाजकल्याण विभागाला माहिती मागितली होती. त्या वसतिगृहावर नेमके नियंत्रण कुणाचे, मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कुणाची, वार्डन व अन्य निवासी लोकांचा ड्युटी टाईम व अन्य मुददयांबाबत माहिती मागविली होती. तर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१८ च्या अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याइतपत पुरावे आपल्याकडे होते, त्यामुळे मूळ खुनाच्या गुन्ह्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१८ च्या कलम ७५ ची वाढ करण्यात आल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली.