अमरावतीत जलसंधारण विभागाचा पेपर फुटला?, परिक्षार्थींमध्ये गोंधळ
By उज्वल भालेकर | Published: February 21, 2024 05:26 PM2024-02-21T17:26:23+5:302024-02-21T17:28:31+5:30
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती.
अमरावती: महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातील वर्ग दोन अधिकारी पदासाठी सुरू असलेल्या परीक्षेचा पेपर बुधवारी फुटल्याने परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला. शहरातील सिटीलँण्ड येथील ऑनलाइन परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडून संबधित एका परीक्षार्थीला उत्तरे पुरविण्यास मदत केल्याचा अरोप परीक्षार्थींकडून होत आहे. त्यामुळे काही वेळा करीता परीक्षा केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस प्रशासन देखील केंद्रावर पोहचले होते.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. यानुसार २० व २१ फेब्रुवारी रोजी तीन पाळीमध्ये ही ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघड झाली. विशेष म्हणजे, मृदू व जलसंधारण विभागाच्या एका अधिकाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरविण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शहरातील सिटीलँण्ड येथील एका अधिकाऱ्याने ही प्रश्नपत्रिका फोडण्यास मदत केल्याचा परीक्षार्थींचा अरोप आहे. याचे पुरावेही काही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवले आहे. यापूर्वीही अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी झालेल्या तलाठी परीक्षेतही अशाच गोंधळ झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा देणऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. मृद व जलसंधारण विभागातील पेपर फुटीचा प्रकार लक्षात येताच एकच गोंधळ केला. संबधित परीक्षा रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्याची मागणी यावेळी परीक्षार्थींकडून करण्यात आली आहे.