‘लॉकडाऊन’च्या मार्गावर अमरावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:00 AM2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:51+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व मॉल, आठवडी बाजार, गुरांच्या बाजारात नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रतिबंधक उपाययोजनांचा एक भाग म्हणून पाच दिवस जिल्हा ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावर प्रतिबंधक उपाययोजनांसाठी दैनंदिन वापरातील अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वगळता २१ ते २५ मार्च दरम्यान संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी सायंकाळी जारी केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व मॉल, आठवडी बाजार, गुरांच्या बाजारात नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रतिबंधक उपाययोजनांचा एक भाग म्हणून पाच दिवस जिल्हा ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार आहे. २१ ते २५ मार्च या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सोने-चांदीची दुकाने, कापड, ऑटोमोबाइल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स, टिंबर, प्लायवूड आदी दुकानांमध्ये नागरिकांच्या होणाºया गर्दीमुळे कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सदर उपाययोजना करण्यात आली आहे. किराणा, औषधे, फळे, भाजी आदी जीवनावश्यक साहित्याची दुकाने सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी आदेशात म्हटले आहे.
पोलिसांना कारवाईचे अधिकार
जिल्हाधिकाºयांनी २१ ते २५ मार्च दरम्यान जिल्ह्यातील प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन व्यक्ती, संस्था वा संघटनेने केल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदींनुसार दंडनीय कायदेशीर कारवाईचे आदेश पोलिसांना बहाल करण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने पोलिसांना जिल्हा बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
महापालिकेत व्यापाऱ्यांची बैठक
महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांचीही बैठक याच विषयात शुक्रवारी दुपारी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी दिली. चर्चेअंती २१ ते २५ मार्च या कालावधीत बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, एम.आय.डी.सी. असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, सातुर्णा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा, यश पोपली, पवन हरवाणी, मंगल दारा, मनोज खंडलेवाल, विनाद कलंत्री, बालकिसन पांडे, रवींद्र सलुजा, चंद्रकांत पोपट, आत्माराम पुरशवानी, पप्पू गगलानी, प्रमोद भारतीया, बादल कुलकर्णी, अनिल पमनानी आदी उपस्थित होते.
रविवारी जनता कर्फ्यूला सहकार्य करा
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी शासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्व नागरिकांनी जागरूक व सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नवाल यांनी केले आहे.