Amravati: जिल्हा स्त्री रुग्णालयाची नवी इमारत कधी कार्यान्वित होणार? लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
By उज्वल भालेकर | Published: July 3, 2024 07:07 PM2024-07-03T19:07:22+5:302024-07-03T19:07:43+5:30
Amravati News: अमरावती - जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरिन) येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु ही इमारत काही किरकाेळ कामांमुळे अजूनही रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. येथील २०० बेडच्या अनुषंगाने आकृतिबंधाचा प्रस्तावदेखील मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असून, तो प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे.
- उज्वल भालेकर
अमरावती - जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरिन) येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु ही इमारत काही किरकाेळ कामांमुळे अजूनही रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. येथील २०० बेडच्या अनुषंगाने आकृतिबंधाचा प्रस्तावदेखील मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असून, तो प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे; परंतु याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे राज्याच्या सुरू असलेल्या अधिवेशनात तरी लोकप्रतिनिधी इमारत कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डफरिन रुग्णालयात रोज जिल्हाभरातील शेकडो गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल होत असतात. जिल्ह्यातील हे एकमेव रेफर सेंटरही आहे. डफरिनची जुनी इमारत इंग्रजकालीन असून, रुग्णसंख्येच्या तुलनेत सदर इमारतीमधील सोयीसुविधा या अपुऱ्या आहेत. या ठिकाणी दोनशे खाटांची सुविधा असून, प्रत्यक्षात २५० ते ३०० च्या आसपास गर्भवती महिला उपचारासाठी दाखल असतात. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी, तसेच महिलांना योग्य सुविधा मिळावी, याकरिता या ठिकाणी २०० खाटांचे अतिरिक्त रुग्णालय या परिसरात उभारण्यात आले आहे. जवळपास ४५ कोटी रुपयांच्या खर्चातून या रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी २०१३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये वर्कऑर्डर काढण्यात आली.
सध्या इमारतीचे बांधकाम हे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, काही किरकोळ फर्निचरचे काम बाकी आहे. २६ एप्रिल २०२२ मध्ये डफरिनच्या जुन्या इमारतीत झालेल्या व्हेंटिलेटर स्फोटानंतर लवकरच नवी इमारत कार्यान्वित करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; परंतु या घटनेनंतर दीड वर्षाचा कालावधी उलटूनही नवीन इमारत कार्यान्वित झालेली नाही. मंजुरीसाठी पाठविलेला २०० बेडचा आकृतिबंधाचा प्रस्तावदेखील मंजूर झालेला नसून, तो मंत्रालयात पडून आहे. सुरू असलेल्या राज्याच्या अधिवेशनात जिल्ह्यातील आमदारांनी यासंदर्भात पाठपुरावा करून तातडीने जिल्ह्यातील महिला व बालकांसाठी नवीन इमारत कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.