अमरावतीकरांनो, साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:30 PM2018-06-29T22:30:53+5:302018-06-29T22:31:24+5:30

मुंबई शहरात लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात इतरत्र लेप्टोचा फैलाव नसला तरी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

Amravati workers, avoid traversal in irrigated water | अमरावतीकरांनो, साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण टाळा

अमरावतीकरांनो, साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण टाळा

Next
ठळक मुद्देलेप्टोसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना : महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुंबई शहरात लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात इतरत्र लेप्टोचा फैलाव नसला तरी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्या अनुषंगाने लेप्टोला प्रतिबंध करण्यासाठी घरामध्ये आणि वस्त्यांमध्ये स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे; जेणेकरून उंदरांचे प्रमाण वाढणार नाही. पावसाळ्यात योग्य काळजी घेणे, विशेषत: पायास जखम असल्यास साचलेल्या पाण्यात अथवा पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण टाळण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. दूषित पाणी, माती आणि भाज्यांशी संपर्क टाळणे हा लेप्टो टाळण्याचा उपाय आहे. दूषित पाण्याशी संपर्क ठेवणे अपरिहार्य असल्यास रबरबूट , हातमोजे वापरावेत आणि रोगाची लक्षणे दिसताच आरोग्य यंत्रणेला त्वरित कळवावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.
लागण होण्याची कारणे
लेप्टोची लागण झालेल्या प्राण्यांचे मल-मूत्र, रक्त आणि रक्तघटकांपासून सरळ संबंधाने किंवा वातावरणातून लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरावरील जखमांद्वारे किंवा पातळ स्रायूंद्वारे शरीरात प्रवेश करतात. मात्र, रोगी माणसाकडून हा आजार निरोगी माणसास होत नसल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले.

या अवयवांना बाधा होऊ शकते
च्यकृत, काविळीची लक्षणे दिसतात. मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होऊन ते निकामी होऊ शकते. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास तात्पुरते डायलिसीस करावे लागू शकते. फुफ्फुसाला बाधा झाल्यास रुग्णास खोकला, छातीत दुखणं व खोकल्यातून रक्त येऊ शकते. श्वासोच्छवासाच्या त्रासासारखी गंभीर समस्या उद्भवून कृत्रिम श्वासोच्छवास यंत्राची रुग्णास गरज भासू शकते तसेच रक्तातील पेशी कमी होऊन अंगावर लाल ठिपके अथवा लाल-काळे चट्टे उमटू शकतात. नाकातोंडातून अथवा लघवीद्वारे रक्तस्राव होऊ शकतो. वरील सर्व लक्षणांमुळे लेप्टोस्पायरोसिसशिवाय डेंग्यू किंवा कॉम्प्लिकेटेड मलेरियाबाबत संभ्रम निर्माण होऊ शकते.
रोगनिदान : लेप्टोस्पायरोसिसच्या जिवाणूंविरुद्ध शरीरातील अँटिबॉडीजची चाचणी एलिसा, एमएटी आणि पीसीआर टेस्टद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे निदान करता येते तसेच लिव्हर आणि किडणी या चाचण्या सी.बी.सी, एक्स-रे या द्वारे निदान करण्यास मदत होऊ शकते. माणसाचे रक्त व लघवीमध्ये लेप्टोस्पायरा हे जंतू सापडतात. रक्तात पहिले सात दिवस व लघवीत आजाराच्या दहाव्या दिवसापासून रोगजंतू आढळतात.
उपचार : सौम्य स्वरूपाचा आजार असल्यास बाह्य रूग्ण विभागातून गोळ्या-औषध घेणे आणि गुंतागुंतीच्या वरील नमूद केलेल्या लक्षणांबद्दल सतर्क राहाणे तसेच डॉक्टरांच्याच सल्ल्याने औषधोपचार करणे गरजेचे आहे. पेनिसिलिन हे औषध गंभीर रुग्णांवर फायदेशीर ठरते. स्ट्रेप्टोमायसिन व ट्रेटासायक्लिन ही प्रतिजैविकेसुद्धा उपयुक्त आहेत. मात्र, रोग टाळण्यासाठी प्रतिबंधक औषधे ( केमोप्रोफिलॅक्सिस) देऊ नयेत.

Web Title: Amravati workers, avoid traversal in irrigated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.