ट्रकच्या काळपट धुराने अमरावतीकर कासावीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:52 PM2019-07-16T23:52:17+5:302019-07-16T23:52:30+5:30
शहरात धूर ओकणाऱ्या वाहनांचा शिरकाव वाढला आहे. त्यामध्ये मोठ्या ट्रकचा व जड वाहनांचासुद्धा समावेश असून, एमआयडीसीतील एका लघुउद्योगातून जेवढे प्रदूषण होते, तेवढेच प्रदूषण गडद काळा धूर ओकणाऱ्या ट्रकमधून होत असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात धूर ओकणाऱ्या वाहनांचा शिरकाव वाढला आहे. त्यामध्ये मोठ्या ट्रकचा व जड वाहनांचासुद्धा समावेश असून, एमआयडीसीतील एका लघुउद्योगातून जेवढे प्रदूषण होते, तेवढेच प्रदूषण गडद काळा धूर ओकणाऱ्या ट्रकमधून होत असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, शहरातून धूर ओकत वायुप्रदूषणाचे स्रोत ठरणाऱ्या अशा ट्रकमुळे नागरिकांना दमा व श्वसननलिकेसंबंधी आजारांत वाढ झाल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. असे ट्रक शहरातून हद्दपार व्हावेत व चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जावा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
१५ वर्षांपेक्षा जास्त आयुष्य झालेले शेकडो ट्रक व जड वाहने गडद काळा धूर ओकत वायुप्रदूषण करीत धावत असल्याची माहिती आहे तसेच ट्रकमध्ये इंधन म्हणून वापरल्या जाणाºया डिझेलमध्ये रॉकेलची भेसळ करून वाहने चालविली जातात. अशा ट्रकच्या सायलन्सरमधून काळा धूर मोठ्या प्रमाणात निघत असून, ते ट्रक शहराच्या मुख्य भागातून धावत असल्याचे वास्तव आहे. त्याकारणाने शहरातील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषत: लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. सायलेन्सरमधून काळा धूर ओकत जड वाहने व ट्रक धावत असतील, तर आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षक व पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. भेसळयुक्त इंधनाचा वापर केला जात असेल, तर महसूल विभागाने कारवाई करायला हवी. मात्र, यासंदर्भाची कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे वास्तव आहे. त्याकारणाने अशा ट्रकच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ घरगुती वसाहत व वाणिज्यिक भागातील प्रदूषणाचे नोंद घेते. तीनही भागातील प्रदूषण प्रत्येकी १०० आरएसपीएम (रेस्परिरेबल सस्पेंड्स पार्टिक्यूलर मॅटर म्हणजे श्वसनशील धूलिकण) यापेक्षा जास्त आरएसपीएम वाढायला नको. उन्हाळ्याच्या दिवसांत कर्मिशियल एरिया म्हणजे राजकमल चौकातील प्रदूषण हे १०० आरएसपीएमपेक्षा जास्त वाढले होते, अशी नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी यापूर्वी घेतली आहे. शहरात अनधिकृतपणे अनेक कालबाह्य ट्रक धावत आहेत. भेसळयुक्त इंधनातून ‘सल्फर डायआॅक्साइड’ व ‘नायट्रोजन डायआॅक्साइड’ हे घातक घटक हवेत मिसळून वायुप्रदूषण करतात. याला पायबंद घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. आरटीओमध्ये पार्सिंग करताना नियमानुसार आयुष्य संपलेल्या ट्रक स्कॅ्रपमध्ये निकाली निघायला हवेत.
एका ट्रकच्या धुरातून लघुउद्योगाएवढे प्रदूषण
एमआयडीसी परिसरात लघुउद्योगांना परवानगी देताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार नाही, अशी हवी द्यावी लागते. निकषानुसार उपाययोजना करून प्रदूषण थांबविण्याकरिता प्रयत्न करण्यात येतात. तरीही काही प्रमाणात प्रदूषण हे होतेच. शहरात धूर ओकत धावणारा ट्रकसुद्धा मोठ्या प्रमाणांत प्रदूषण करीत असून, जेवढे प्रदूषण लघुउद्योग करतो, तेवढे प्रदूषण धूर ओकत फिरणारा एक ट्रक करीत असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी दिली आहे. त्यामुळे अशा ट्रकचालकांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
वायू प्रदूषणाचा काय धोका ?
वायुप्रदूषणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे विविध रोगांना संबंधित व्यक्ती सहज बळी पडू शकतो. प्रदूषणामुळे व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर व मनावरसुद्धा विपरीत परिणाम होतो. याची लक्षणे स्पष्ट दिसत नसली तरी त्याचे परिणाम कित्येक वर्षे हळूहळू होत असतो तसेच दमा व श्वासोच्छश्वासासंदर्भात आजार बळावतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
१०० आरएसपीएम केले पार
ज्या ट्रकचे आयुष्य १५ वर्षांपेक्षा जास्त झाले आहेत, असे नादुरुस्त व डिझेलमध्ये रॉकेल मिसळल्याने करून धूर ओकणारे सरासरी शंभर ट्रक शहरातून धावत असतील, तर या ट्रकमधून निघणारा धूर हा दिवसभरात १०० आरएसपीएमचे प्रमाणसुद्धा पार करतात, असे मत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे. पोलीस, आरटीओ व महसूल विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी आहे. आहे.
धूर ओकणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्याचा आम्हाला अधिकार नाही. त्यासंदर्भात आरटीओ व पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. कुठल्याही घरगुती वसाहत किंवा वाणिज्य क्षेत्रात १०० आरएसपीएमपेक्षा जास्त प्रदूषण धोकादायक ठरू शकते.
-एस. डी. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
आम्ही वाहनाची पीयूसी तपासणी करतो. पीयूसी नसेल, तर अशा वाहनचालकांना एक हजाराचा दंड ठोठावण्यात येतो. ट्रकमध्ये रॉके लमिश्रित इंधनाचा वापर होत असेल, तर महसुल विभागाला कारवाईचे अधिकार आहेत. आमच्या नियमित कारवाया सुरूच आहेत.
- रामभाऊ गिते
प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.