अमरावतीकरांनी थकविला ३० कोटींचा कर; दीड महिन्यात शत-प्रतिशत वसुलीचे आव्हान
By प्रदीप भाकरे | Published: February 15, 2023 05:53 PM2023-02-15T17:53:21+5:302023-02-15T17:54:12+5:30
झोननिहाय वसुली शिबिरांवर भर
अमरावती : महापालिकेच्या स्वउत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासकीय यंत्रणा सरसावली असताना १० फेब्रुवारीअखेर केवळ ३१ कोटी ८२ लाख रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी पुढील दीड महिन्यात सुमारे ३० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान कर यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. ही वसुली करण्यासाठी आता झोननिहाय वसुली शिबिरांवर भर दिला जात आहे.
सुमारे दहा लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमरावती महापालिकेची संपूर्ण मदार मालमत्ता कर व नगररचना विभागातील वसुलीवर अवलंबून आहे. गतवर्षापर्यंत ४० कोटींच्या घरात असलेली कराची एकूण मागणी सन २०२२-२३मध्ये सुमारे ६१ कोटी ९९ लाखांपर्यंत पोहोचली. त्यात ४० टक्के दरवाढ करून आलेल्या कराच्या रकमेचा समावेश होता. मात्र, त्या दरवाढीला स्थगिती देण्यात आल्याने यंदाच्या एकूण मागणीतून सुमारे १२ कोटी रुपये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच्या दीड महिन्यात अजून किमान १८ ते २० कोटी रुपये वसुलीचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.
अशी आहे मागणी
झोन : मालमत्ता : एकूण मागणी
उत्तर : ४१७६५ : १७,४९,८२,६०६
मध्य : २८८७० : १२,३६,८५,७०२
पूर्व : ३६९८५ : १९,४६,३६,४११
दक्षिण : २९७४७ : ८,८९,११,६६१
पश्चिम : ३१७७५ : ३,७७,८२,८२८
एकूण : १६९१४२ : ६१,९९,९९,२०८
अशी आहे झालेली, शिल्लक वसुली
झोन : झालेली वसुली : शिल्लक वसुली
उत्तर : ९,१६,५२,१२४ : ८,३३,३०,४८२
मध्य : ८,०२,६५,५५२ : ४,३४,२०,१५०
पूर्व : ८,१३,७५,६२७ : ११,३२,६०,७८४
दक्षिण : ४,०९,०९,२९८ : ४,८०,०२,३६३
पश्चिम : २,४०,९१,७७२ : १,३६,९१,०५६
राजापेठ, भाजी बाजार अव्वल
१ एप्रिल २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पाचही झोनमधून एकूण ५१.३४ टक्के वसुली झाली आहे. यात झोन १ ची वसुली ५२.३८ टक्के, राजापेठ झोन क्रमांक २ मधून ६४.८९ टक्के, पूर्व अर्थात दस्तुरनगर झोन क्रमांक ३ ची सर्वात कमी ४१.८१ टक्के, दक्षिण अर्थात बडनेरा झोन क्रमांक ४ मधून ४६.०१ टक्के तर भाजी बाजार झोन क्रमांक ५ ची वसुली ६३.७६ टक्के अशी झाली आहे.