अमरावतीकर रॅपर आर्या जाधव मराठी बिग बॉसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:22 AM2024-08-05T11:22:25+5:302024-08-05T11:23:31+5:30
पाचव्या पर्वातील स्पर्धक: गीतलेखन, गायन, चाल सबकुछ आर्याच
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एका खासगी वाहिनीवरील 'हसल-२' या कार्यक्रमात रॅप प्रकारातील गायनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अमरावतीकर आर्या जाधव ही आता 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. आर्या ही येथील उद्योजक हेमंत जाधव यांची कन्या. येथील कॅम्प परिसरात वास्तव्याला असलेल्या आर्या जाधव हिला गायन व गीतलेखनाची आवड आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला रविवारपासून सुरुवात झाली. त्यात ती सहभागी झाली आहे. ती उत्तम परफॉर्मन्सदेखील करीत आहे.
मराठमोळा रितेश देशमुख मराठी बिगबॉसचे सूत्रसंचालन करत असून, आर्यासह अन्य स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. कोरोना काळात घरी असताना आर्याला एक दिवस रॅप लिहिण्याची कल्पना सुचली. त्यानंतर घराच्या छतावर बसून आर्याने रॅप लिहायला सुरुवात केली. 'हसल-२' या कार्यक्रमात आर्याने १० स्पर्धकांना मागे टाकत उपांत्य फेरी गाठली होती. आर्या जाधवचा 'क्यूके' नावाचा स्वतःचा बँड आहे, जो यू ट्यूबवर खूप धमाल करत आहे. आर्याने 'रॅपर गर्ल' म्हणून ओळख मिळवली आहे. 'कलर्स मराठी'वर आता प्रेक्षकांना रोज रात्री ९ वाजता 'बिग बॉस मराठी' पाहता येणार आहे.
आर्या आर्किटेक्चर, नव्हे 'क्युके'
आर्याने येथील होली क्रॉस हायस्कूलमधून दहावी तर गोल्डन किड्समधून बारावी उत्तीर्ण केली. नागपूरला बी. आर्क केल्यानंतर कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम सुरू असताना रॅप सिंगिंगमध्ये ती रस घेऊ लागली. त्यातून पुढे मिळालेल्या संधीचे सोने करत ती सोशल मीडियातून, यू ट्यूबच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्यातली ताईत बनली. 'क्यूके नावाच्या स्वतःच्या बँडने ती घराघरात पोहोचल्याने तिला मराठी बिग बॉसमधून बोलावणे आल्याचे तिचे वडील तथा ख्यातनाम उद्योजक हेमंत जाधव यांनी 'लोकमत'ला सांगितले. आर्याची आई रश्मी या गृहिणी असून, तिचा लहान भाऊ शिवराज हा इंजिनिअर आहे.