कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोजसाठी अमरावतीकरांची बडनेरात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:43+5:302021-04-29T04:09:43+5:30
बडनेरा : शहरासह जिल्ह्यात कोव्हक्सिनचे लसीकरण केंद्र जवळजवळ बंदच आहेत. साठा देखील तोकडा आहे. त्यामुळे जिथे ही लस उपलब्ध ...
बडनेरा : शहरासह जिल्ह्यात कोव्हक्सिनचे लसीकरण केंद्र जवळजवळ बंदच आहेत. साठा देखील तोकडा आहे. त्यामुळे जिथे ही लस उपलब्ध होईल तिथे नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या बडनेरा जुन्या वस्तीतील हरिभाऊ वाठ लसीकरण केंद्रात ही लस उपलब्ध असल्याने अमरावतीहून शासकीय कर्मचारी व नागरिकांनी बडनेराकडे धाव घेतल्याने या केंद्रात अचानक गर्दी वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्या १० ते १२ दिवसांपासून लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. मागणीनंतर गेल्या तीन दिवसांपासून सर्वच केंद्रांवर जेमतेम लसीचे डोज मिळणे सुरू झाले. मात्र, कोव्हॅक्सिनचा अत्यल्प पुरवठा व कमी केद्रांमुळे अमरावतीकरांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ या केंद्राकडे लस टोचून घेण्यासाठी धाव घेतली. बडनेरा शहरात जेमतेम पुरवठ्यावर लसीकरण सुरू आहे चावडी चौकातील या केंद्रावर गेल्या दोन दिवसांपासून ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांनाच लसीकरण केले जात असल्याची माहिती येथील नोडल अधिकारी राहुल माहुरे यांनी दिली
या ठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर अमरावती शहरासह साईनगर, गोपालनगर, नवाथे व लगतच्या ग्रामीण परिसरातील लोक लस टोचून घेण्यासाठी येत आहे. येथे लसींचा पुरवठा वाढविण्यासोबतच एखादे जास्तीचे केंद्र सुरू करण्याची गरज देखील निर्माण झाली आहे नव्या वस्तीच्या मोदी दवाखान्यात फक्त कोविशिल्ड हीच लस दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी प्रत्येक केंद्रावर लस कोणती याविषयी ठळकपणे लिहिले जाणे महत्त्वाचे आहे.
बॉक्स
येथे मिळतो फक्त दुसरा डोस
ज्या अधिकारी, कर्मचारी व नागगरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला, त्यांनाच प्राधान्याने दुसरा डोस देणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे व ज्यांना २८ दिवस पूर्ण होत आहे त्यांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी जाण्याची सूचना महापालिका प्रशासनाद्वारा केल्यानंतर गर्दीत भर पडली आहे.