तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी कलशाचे अमरावतीकरांनी घेतले दर्शन, जागतिक धम्म परिषदेचा समारोप
By उज्वल भालेकर | Published: February 25, 2024 09:57 PM2024-02-25T21:57:45+5:302024-02-25T21:58:34+5:30
भिक्खू संघानी दिली धम्मदेसना
उज्वल भालेकर, अमरावती: जिल्ह्यात पहिल्यांदाच जागतिक धम्म परिषदेच्या अनुषंगाने श्रीलंकेतील तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी शहरात आणण्यात आल्या होत्या. शनिवारी या अस्थी कलशाची शहरातून अभिवादन पदयात्रा निघाली. यावेळी अमरावतीकरांनी या अस्थी कलशाचे दर्शन घेतले. सायन्सकौर मैदान येथील दोन दिवसीय या धम्म परिषदेमध्ये भिक्खू संघाच्या वतीने उपस्थितांना धम्मदेसनादेखील देण्यात आली. तसेच रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून अस्थी कलश सार्वजनिक दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.
परियती फाउंडेशन व जागतिक धम्म परिषद कृती समितीच्या वतीने अमरावतीमध्ये पहिल्यांदाच जागतिक धम्म परिषदचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये या जागतिक धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आले, तर धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्रीलंका येथील भदंत मानापहा सुबोधी वंशा थेरो हे होते. तर अतिथी म्हणून भदंत नागसेन, भदंत शीलधन, भदंत नंदघोष, संघशीला श्रामनेरी, कुंडलकेसा श्रामनेरी, खिमा भिकुनी, भदंत रत्नपाल, भदंत नंदघोष, मुख्य आयोजक प्रमोद इंगळे, राजेश वानखडे, रवींद्र वैद्य, प्रकाश बनसोड, साहेबराव वानखडे, किरण गुडदे, व्ही. एम. वानखडे, अंकुश आठवले, सुनील रामटेके, वंदना तायडे, नितीन कदम, तृप्ती मेश्राम, राहुल मेश्राम, अनिता सोमकुवर, विनोद इंगळे, आदी मान्यवर धम्मपीठावर विराजमान होते. या धम्म परिषदेच्या उद्घाटनापूर्वी शहरातून अस्थी कलशाची अभिवादन रॅली काढण्यात आली. ही यात्रा डॉ. आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक मार्गे रुक्मिणी नगर सायन्सकौर मैदानात पोहोचली. यात्रेत देश विदेशातील भदंत, हजारो धम्म उपासक व उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. दोन दिवसीय या धम्म परिषदेमध्ये भिक्खू संघाच्या वतीने धम्मदेसना देण्यात आली. तसेच रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून तथागत गौतम बुद्धांचे अस्थी कलश सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. सायंकाळी चलो बुद्ध की और या गीतगायन कार्यक्रमाने धम्म परिषदेची सांगता झाली.