अमरावतीकरांनी अनुभवला चंद्रग्रहणाचा क्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:25 PM2019-07-17T23:25:44+5:302019-07-17T23:26:00+5:30
भारतातून दिसणाऱ्या पहिल्या चंद्रग्रहणाचे विलोभनीय क्षण अमरावतीकरांनी मंगळवारी रात्री अनुभवले. रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण पहाटे ४ वाजता संपले.
अमरावती : भारतातून दिसणाऱ्या पहिल्या चंद्रग्रहणाचे विलोभनीय क्षण अमरावतीकरांनी मंगळवारी रात्री अनुभवले. रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण पहाटे ४ वाजता संपले.
ग्रहण पाहण्यासाठी कसल्याही प्रकारच्या चष्म्याची किंवा दुर्बिणीची गरज नव्हती. त्यामुळे हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता आले. मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने यांच्या दीप नगरातील घरावरून खंडग्रास चंद्रग्रहणातील विलोभनीय क्षणाचा आनंद अनेकांनी घेतला. चंद्रावर पडणारी छाया हळूहळू वाढल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मध्यरात्री ३ वाजून १ मिनिटांनी चंद्रग्रहणाची सर्वोच्च ग्रहणस्थिती होती. पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी चंद्र सावलीतून बाहेर पडला. भारतातून दिसणारे हे वर्षातले एकमेव चंद्रग्रहण असल्यामुळे अनेक खगोलप्रेमींनी या ग्रहणाचा अनुभव घेतला. चंद्रग्रहण पाहताना उपस्थितांना मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने, विजय गिरुळकर व रवींद्र खराबे उपस्थित होते.