देशात पदव्युत्तर अभियांत्रिकी शाखेकरिता अमरावतीने दिले आदर्श अभ्यासक्रम,  अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 06:03 PM2018-02-01T18:03:04+5:302018-02-01T18:03:38+5:30

देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासायनिक तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विलास सपकाळ यांनी दिलेल्या एम.टेक.च्या अभ्यासक्रमाला स्थान मिळाले आहे. सदर आदर्श अभ्यासक्रम दिल्ली येथे २४ जानेवारी रोजी या विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रकाशित केला.

Amravati's best course for postgraduate engineering branch in the country, presented to the All India Council of Technical Education | देशात पदव्युत्तर अभियांत्रिकी शाखेकरिता अमरावतीने दिले आदर्श अभ्यासक्रम,  अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला सादर

देशात पदव्युत्तर अभियांत्रिकी शाखेकरिता अमरावतीने दिले आदर्श अभ्यासक्रम,  अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला सादर

Next

- गणेश वासनिक

अमरावती : देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासायनिक तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विलास सपकाळ यांनी दिलेल्या एम.टेक.च्या अभ्यासक्रमाला स्थान मिळाले आहे. सदर आदर्श अभ्यासक्रम दिल्ली येथे २४ जानेवारी रोजी या विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रकाशित केला.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम अद्ययावतीकरण आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय पदव्युत्तर अभ्यासक्रम व संशोधन मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू विलास सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मॉडेल करिक्युलम’ तयार करण्यात आले आहे. 
नवे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिकता, अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण तसेच नावीन्यपूर्ण कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने तयार केले आहेत. या अभ्यासक्रमात प्रगत माहिती व तंत्रज्ञानाला स्थान असल्याने तो जागतिक पातळीवर सर्वमान्य ठरणारा असेल. आदर्श अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट तयार करताना भविष्यात आवश्यक विषय तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी आणि कौशल्यावर भर देण्यात आला आहे. यात आवश्यक व सोबतच वैकल्पिक विषयांसोबत प्रयोगशाळा प्रात्यक्षिकांची जोड देण्यात आली आहे. संशोधनातून बौद्धिक ज्ञानसंपदा तसेच ओपन इलेक्टिव्ह विषयांमध्ये  औद्योगिक क्षेत्रातील अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञान, आर्थिक नियोजन, ऊर्जा, पर्यावरण व संवर्धन, औद्योगिक सुरक्षा आदी विषयांचा अंतर्भाव आहे. दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षात डेझर्टेेशनच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील समस्या, संशोधनावर भर देण्यात आला आहे. औद्योगिक प्रक्रियांमध्ये उत्पादन क्षमता, गुणवत्ता वाढविण्यास हा अभ्यासक्रम मदत करणारा ठरेल. त्यामुळे या अभ्यासक्रमातून देशात पदव्युत्तर शिक्षणाचा दर्जा जागतिक स्तरावर उंचावेल, असा आशावाद विलास सपकाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

सहा प्रमुख अभियांत्रिकी शाखांमध्ये होणार बदल
अभियांत्रिकी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल घडविण्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सहा प्रमुख अभियांत्रिकी शाखांसाठी देशातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांची समिती गठित केली होती. नवा अभ्यासक्रम तयार करण्यापूर्वी औद्योगिक-शैक्षणिक तज्ज्ञ, माजी विद्यार्थी तसेच संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या सूचना, मुद्दे चर्चेअंती विचारात घेण्यात आले आहेत.

असा झाला नव्याने १८ अभ्यासक्रमांचा समावेश
देशपातळीवर एकाच वेळी पदव्युत्तर अभियांत्रिकी, तांत्रिकी शाखेसाठी १८ आदर्श अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यात इलेट्रिकल्स इंजिनीअरिंग शाखेत चार, मॅकेनिकल शाखेत दोन, सिव्हिलमध्ये चार, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन शाखेत तीन आणि केमिकल इंजिनीअरिंग व कम्प्यूटर सायन्स शाखेत पाच अभ्यासक्रमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

Web Title: Amravati's best course for postgraduate engineering branch in the country, presented to the All India Council of Technical Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.