अमरावतीचा ‘क्राईम रेट’ आवाक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:20+5:302021-09-16T04:18:20+5:30
अमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या स्ट्राँग व सोशल पोलिसिंगच्या मिलाफामुळे शहराचा क्राईम रेट घटला आहे. यंदाच्या ...
अमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या स्ट्राँग व सोशल पोलिसिंगच्या मिलाफामुळे शहराचा क्राईम रेट घटला आहे. यंदाच्या ऑगस्टपर्यंत तब्बल ३३८७ सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्याअनुषंगाने क्राईम रेट आटोक्यात आल्याचे सुखद चित्र आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी यंदाच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यातील गुन्हेगारी अहवाल जाहीर केला आहे. त्याचे अवलोकन केले असता, क्राईम रेटमध्ये अव्वल असलेल्या पहिल्या पाचमध्ये अमरावती शहर आयुक्तालयाचा समावेश नाही. अमरावती शहर आयुक्तालयात यंदाच्या पहिल्या सहामाहीत खून, खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, महिला अपराध या गुन्ह्यांमध्ये विशेष वाढ झालेली नाही. शहर आयुक्तालयाने कमी मनुष्यबळात अपराधिक घटनांवर नियंत्रण ठेवल्याचे त्या अहवालातून स्पष्ट होते. सहायक पोलीस आयुक्तांची सात पदे मंजूर असताना शहरातील दहा पोलीस ठाण्याची जबाबदारी केवळ दोन सहायक आयुक्तांवर आहे.
///////////
ऑलआऊट ऑपरेशन
शहरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी, ठेवण्यासाठी आयुक्तालय हद्दीत वेळोवेळी नाकाबंदी, ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. पकड वारंट व शस्त्रजप्तीसाठी देखील विशेष मोहिम राबविली जात आहे. १ जानेवारी ते ३१ ऑगस्टदरम्यान कलम १०७ अन्वये तब्बल ४१०४ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गतवर्षी तो आकडा २८९० असा होता. गतवर्षी एकाही जणांवर एमपीडीए लावण्यात आला नाही. यंदा तो आकडा पाचवर पोहोचला आहे.
/////////
काय म्हणतो अहवाल
अर्धवार्षिक अहवालातील सांख्यिकीनुसार, राज्यात खुनाच्या गुन्ह्यात १५.३३, खुनाचा प्रयत्न १५.०५, दंगा ४.५२, दरोड्याच्या गुन्ह्यात ३५.४१, जबरी चोरीमध्ये २४.८२, घरफोडीच्या गुन्ह्यात १४.७१, चोरीच्या गुन्ह्यात ७.६१ तर, राज्यात महिला विषयक गुन्ह्यामध्ये ६.३३ टक्क्यांनी वाढ झाली. वाढ झालेल्या प्रथम पाच आयुक्तालय वा पोलीस अधीक्षक घटकांमध्ये अमरावती शहराचा समावेश नाही.