अमरावतीचा श्रेणिक साकला जेईई मेन्समध्ये राज्यातून अव्वल

By गणेश वासनिक | Published: August 8, 2022 05:34 PM2022-08-08T17:34:53+5:302022-08-08T18:20:03+5:30

सीबीएसई बारावीतही होता अव्वल, आयआयटी पवईतून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करण्याचा मानस

Amravatis lad Shrenik Sakala ranks tops in the state in JEE Mains 2022 | अमरावतीचा श्रेणिक साकला जेईई मेन्समध्ये राज्यातून अव्वल

अमरावतीचा श्रेणिक साकला जेईई मेन्समध्ये राज्यातून अव्वल

googlenewsNext

अमरावती : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यापूर्वी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन्स) चा सोमवारी निकाल जाहीर झाला. यात अमरावती येथील श्रेणिक मोहन साकला २९५ गुण मिळवित राज्यातून अव्वल आला, तर देशभरात ११ व्या स्थानी झळकला आहे. आयआयटी पवई येथून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करण्याचा मानस त्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

दहावीपर्यंतचे शिक्षण येथील आयजीसीएस पॅटर्ननुसार शाश्वत स्कूलमधून घेतले, तर महर्षी पब्लिक सीबीएसई स्कूलमधून अकरावी, बारावी उत्तीर्ण केली. बारावीतसुद्धा तो जिल्ह्यातून अव्वल आला होता. श्रेणिकने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावे, अशी वडील मोहन आणि आई निशा यांची इच्छा होती. पण, त्याचा मूळ स्वभाव हा संशोधकाचा आहे. नवव्या वर्गात असताना मुंबईच्या डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या स्पर्धेत त्याने सादर केलेल्या संशोधन प्रकल्पाला सुवर्णपदक बहाल झाले.

हाच विषय टर्निंग पाईंट ठरला. यानंतर वैद्यकीय नव्हे तर अभियांत्रिकी क्षेत्राकडे श्रेणिकने वळावे, असा निर्णय साकला कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर जेईई परीक्षांची तयारी सुरू झाली. सोमवारी जाहीर झालेल्या निकालातून श्रेणिक याने जेईई मेन्समध्ये राज्यातून अव्वल येण्याची किमया केली. जेईई मेन्स- २०२२ परीक्षा बी.ई, बी.टेक पेपर १ च्या निकालानुसार देशातून २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले. यात श्रेणिक साकला हा अव्वलस्थानी आहे. आता त्याने २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेची तयारी चालविली आहे. श्रेणिकचे वडील मोहन साकला यांचा ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस. आदल्याच दिवशी मुलाची गगनभरारी हे त्यांच्यासाठी बर्थडे गिफ्ट ठरले, हे विशेष.

अंबाडीच्या भाजीवर केले होते संशोधन
विदर्भाच्या मातीत अलगदपणे उगवणारी आंबाडीची भाजी ही कशी गुणकारी आहे, हे श्रेणिकने संंशोधन प्रकल्पातून सिद्ध केले आहे. याच प्रकल्पाला डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्राने सुवर्णपदकाने गौरविले होते. अंबाडीच्या भाजीचा जागतिक स्तरावर होणारा वापर आणि त्यापासून तयार होणारे सरबत व अन्य खाद्यपदार्थांची माहिती सादर केली होती. या भाजीतून ॲन्टीऑक्सिडंट मिळतात, हे प्रकल्पातून त्याने सिद्ध केले होते.

Web Title: Amravatis lad Shrenik Sakala ranks tops in the state in JEE Mains 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.