‘त्या’ यादीत अमरावतीचे सात प्रकल्प?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:31+5:302021-07-31T04:14:31+5:30
अमरावती : विहित वेळेत गृहप्रकल्प पूर्ण न करणाऱ्या बिल्डर्सना महारेराने दणका दिला आहे. राज्यातील तब्बल ६४४ गृहप्रकल्प महाराष्ट्र ...
अमरावती : विहित वेळेत गृहप्रकल्प पूर्ण न करणाऱ्या बिल्डर्सना महारेराने दणका दिला आहे. राज्यातील तब्बल ६४४ गृहप्रकल्प महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकले आहेत. त्यात अमरावती शहरातील सात गृहप्रकल्पांचा समावेश आहे.
या सर्व प्रकल्पातील घरांच्या विक्री, जाहिरात व विपणनावर बंदी घालण्यात आली आहे. जे प्रकल्प आता काळ्या यादीत टाकण्यात आले, ते प्रकल्प बांधकाम पूर्ण होऊन २०१७ आणि २०१८ मध्ये घर विकत घेणाऱ्यांच्या सुपूर्द करायला हवे होते. मात्र, ते प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्यात आले नाहीत. या प्रकल्पांना महारेराने दिलेली नोंदणीदेखील संपुष्टात आली आहे. आता त्या गृहप्रकल्पाचे प्रमोटर त्या प्रकल्पांविषयी जाहिरात देऊ शकणार नाहीत. दरम्यान, २०१७ मध्ये दोन, तर २०१८ मध्ये अमरावतीमधील पाच प्रकल्पांची नोंदणी ‘एक्सपायर्ड’ झाल्याची नोंद महारेराच्या संकेत स्थळावर आहे.
कोट
महारेरामध्ये गृहप्रकल्पाची नोंदणी केली. संपूर्ण दस्तावेज दाखल केले होते. तांत्रिक प्रक्रियादेखील पूर्ण केली. ‘त्या’ यादीबाबत भाष्य करता येणार नाही.
- जयराज बजाज, बांधकाम व्यावसायिक, अमरावती