अमरावतीच्या ‘वॉटर मॅन’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By उज्वल भालेकर | Published: May 28, 2023 01:54 PM2023-05-28T13:54:17+5:302023-05-28T13:54:29+5:30

पाण्यावर तरंगत सादर केली २२ मिनीटांमध्ये योगासनाचे ५२ प्रकार

Amravati's 'Water Man' entered in India Book of Records | अमरावतीच्या ‘वॉटर मॅन’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

अमरावतीच्या ‘वॉटर मॅन’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

googlenewsNext

अमरावती : शहरातील पोलीस कर्मचारी जलतरणपटू (वॉटर मॅन) प्रवीण आखरे यांनी पाण्यावर तरंगत २२ मिनिटांमध्ये योगासनाचे विविध ५२ प्रकार सादर करत आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे. रविवार २८ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथील तक्षशिला जलतरण केंद्रावर त्यांनी हा रेकॉर्ड आपल्या नावी केला. यावेळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनोज तत्ववादी यांनी त्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

जमिनीवर सादर केली जाणारी योगासने व प्राणायम ही आता पाण्यावरही तरंगत करण्याची अनोळखी संकल्पना ही अलिकडच्या काळातच साकार झाली आहे. पाण्यावर तरंगत पद्मासन, पर्वतासन, भद्रासन, वृक्षासन, मत्स्यासन, मर्कटासन अशा प्रकारची विविध योगासने केली जातात. या अनोख्या संकल्पनेच्या जोरावर अमरावतीमधील जलतरणपटू प्रविण आखरे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनोज तत्ववादी यांनी प्रविण आखरे यांना एक तासांमध्ये २५ योगासनाची प्रकार सादर करण्याचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत प्रविण आखरे यांनी अवघ्या दहा ते बारा मिनिटातच २५ योगासने सादर केली तर २२ मिनिट पाण्यावर तरंगत त्यांनी योगासनाची विविध ५२ प्रकार सादर करत देशातील नवा विक्रम आपल्या नावी केला आहे.

यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, उपायुक्त विक्रम साळी, श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव पी.आर.एस. राव, प्रशासकीय अधिकारी प्रा. सचिन पंडीत उपस्थित होते.

आखेर यांनी वाचविले ५५ नागरिकांचे प्राण

प्रविण आखरे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच पोहण्याचा छंद जोपासत आहे. ते मागील २२ वर्षापासून पोलीस विभागात कार्यरत आहेत. ते सध्या पोलीस जलतरण केंद्राचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. २०१२ ते २०१९ या कालावधीमध्ये त्यांनी जिल्हा पुर व नियंत्रण तसेच शोध व बचाव पथकामध्ये कार्यरत असताना त्यांनी आतापर्यंत ७८ मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. त्याच बरोबर ५५ नागरिकांचे प्राणही त्यांनी वाचविले आहेत.

राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस

प्रविण आखरे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र मंबई यांनी २०२० मध्ये पोलीस महासंचालक या पदकाने सन्मानित केले आहे. पोलीस विभागात काम करतांना आज पावेतो ३२८ बक्षीसांची उत्कृष्ठ शेन्यासह नोंद त्यांच्या नावे आहे. प्रविण आखरे यांचे वडील देखील पोलीस विभागात कार्यरत होते. त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रविण आखरे यांची देखील राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करण्यात आली आहे.

प्रविण आखरे यांनी पाण्यावर तरंगत सर्वाधिक योगासने करण्याचा इंडियाचा रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे. आखरे यांचा हा विक्रम अमरावती विभागाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागासाठी अभिमानाची बाब आहे.

नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त, अमरावती शहर

५० मिटर अंडर वॉटर रेकॉड करण्याचा मानस

लहानपणापासूनच पोहण्याचा छंद आहे. त्यामुळे काही वेगळे करण्याची इच्छा मनामध्ये होती. त्यामुळे रोज पाण्यावर योगासने करण्याचा सराव केला. या सरावामुळेच आज मी हा रेकॉर्ड करु शकलो. आता ५० मिटर अंडर वॉटर रेकॉर्ड करण्याचा माझा मानस असून त्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.
प्रविण आखरे, जलतरणपटू (वॉटर मॅन)

Web Title: Amravati's 'Water Man' entered in India Book of Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.