अमरावतीच्या ‘वॉटर मॅन’च्या नावर शरीराची हालचाल न करता पाण्यात ६२ मिनिटे उभ्या स्थितीत राहण्याचा विक्रम
By उज्वल भालेकर | Published: September 10, 2023 06:36 PM2023-09-10T18:36:52+5:302023-09-10T18:39:14+5:30
यावेळी इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनोज तत्ववादी यांनी या विक्रमाची घोषणा केली.
अमरावती: शहर पोलिस विभागात कार्यरत असलेले जलतरणपटू प्रवीण आखरे यांनी नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे. रविवारी त्यांनी पाण्यात उभ्या स्थितीत शरीराची हालचाल न करता १ तास २ मिनीट स्थिर राहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बरोबरच आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. हा विक्रम त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या जलतरण केंद्रावर केला आहे. यावेळी इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनोज तत्ववादी यांनी या विक्रमाची घोषणा केली.
जलतरणपटू प्रवीण आखरे यांची अमरावतीचा ‘वॉटर मॅन’ अशीही ओळख आहे. त्यांना जमिनीवर सादर केली जाणारी योगासने व प्राणायम ही पाण्यावर तरंगत करण्याची कला अवगत आहे. याच कलेच्या आधारे त्यांनी आता नवा विक्रमच आपल्या नावी केला आहे. त्यांनी ‘व्हर्टिकल फ्लोटिंग विदाऊट फिजिकल मूव्हमेंट’ म्हणजेच पाण्यावर शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल न करता उभ्या स्थितीमध्ये जास्त वेळ स्थिर राहण्याच्या प्रकारात विक्रम केला आहे. आखरे यांना इंडिया बुक रेकॉर्डसाठी ३० मिनिटे आणि आशिया बुक रेकॉर्डसाठी ४५ मिनिट पाण्यात खाली पाय न टकेवता उभे रहायचे होते.
सकाळी ९ वाजता त्यांच्या या विक्रमाला सुरुवात झाली. तब्बल १ तास २ मिनीट म्हणजेच १० वाजून २ मिनीटापर्यंत त्यांनी पाण्यात स्थिर उभे राहत इंडिया बुक रेकॉर्ड आणि आशिया बुक रेकॉर्ड दोन्ही आपल्या नावी केले आहेत. या विक्रमाची घोषणा इंडिया आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनोज तत्ववादी यांनी केली. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त पूनम पाटील यांच्या उपस्थितीत रेकॉर्ड प्रमाणपत्र व पदक प्रदान करुन गौरविण्यात आले यावेळी पीआय अनिल कुरळकर, पीआय पुंडलिक मेश्राम आदी उपस्थित होते.