मिसकॉलहून झालेल्या ओळखीने लुटले ‘ती’चे सर्वस्व!
By प्रदीप भाकरे | Published: September 25, 2022 02:38 PM2022-09-25T14:38:03+5:302022-09-25T14:38:32+5:30
‘मिसकॉल’ने झालेली ओळख एका विवाहितेचे सर्वस्व लुटून गेली. तिला अपहृृतासारखे जीवन जगावे लागले.
अमरावती:
‘मिसकॉल’ने झालेली ओळख एका विवाहितेचे सर्वस्व लुटून गेली. तिला अपहृृतासारखे जीवन जगावे लागले. संधी साधत तिने मोबाइलवर पतीशी संवाद साधल्यानंतर तिची त्या नरकयातनेतून सुटका झाली. अमरावतीत सुखरूप पोहोचल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी तिने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आरोपी महेश धुळे (रा. यवतमाळ) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, सहा महिन्यांपूर्वी घरातील वीज गेली असता, महिलेच्या पतीने आरोपी महेश धुुळे याला दुरुस्तीसाठी बोलावले होते. त्यानंतर पुन्हा एकदा वीजदुरुस्तीसाठी तो आला असता, यापुढे असे झाल्यास मोबाइल नंबर असावा, असे म्हणून त्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर मिसकॉस दिला. त्यातून पुढे ओळख घट्ट झाली. त्यानंतर मोहल्यात आला की, तो महिलेच्या घरी यायचा. गोड बोलायचा. शिक्षणाबद्दल विचारपूस करायचा. आपली अमरावतीला खूप ओळख आहे, तुला १५ ते २० हजार रुपये महिन्याची नोकरी लावून देण्याची बतावणी त्याने केली.
मुलांची टिसीही काढली
माझ्यासोबत अमरावतीला चल, या आरोपीच्या भूलथापेला ती बळी पडली. दोन्ही मुलांची टिसी काढून ती २४ जुलै रोजी पतीला न सांगता आरोपीसोबत घराबाहेर पडली. आरोपी महेश हा दोन दिवस तिला घेऊन अमरावतीच्या एका लॉजमध्ये राहिला. नंतर फ्रेजरपुरा येथील एका घरमालकाला त्याने पती-पत्नी असल्याचे सांगून चार हजार रुपये भाड्याने खोली केली. तेथे राहायला आल्यानंतर महिलेने महेशला नोकरीबद्दल विचारले असता त्यासाठी पैसे लागतात, असे म्हणून तो तिच्याकडून दागिने व पैसे घेऊन गेला.
दारू पिऊन मारहाण
३ ऑगस्ट रोजी रात्री दोनच्या सुमारास आरोपी दारू पिऊन आला. तिला थापडा बुक्क्यांनी मारहाण करून तिच्यासोबत शरीरसंबंध केले. विरोध केला असता, तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन, अशी धमकी देऊन त्याने आपले वारंवार लैंगिक शोषण केल्याचे पीडिताने म्हटले आहे. आरोपीने पीडिताचा मोबाइल घेतल्याने ती पतीला व नातेवाइकांना संपर्क करू शकली नाही. नोकरीची ऑर्डर मागितली असता, तू नखरे करू नको, असे म्हणून ऑर्डर दिली नाही. त्यांनतर तिचे वारंवार शोषण करण्यात आले.
आरोपीची नजर चुकवून साधला संपर्क
२५ ऑगस्ट रोजी सकाळी ८च्या सुमारास ती फ्रेजरपुरा परिसरातील दुकानात सामान आणण्यासाठी गेली असता, आरोपी व त्याच्या मित्राने तिचा पाठलाग केला. घरी परतण्यास नकार देऊन तिने आरोपीची नजर चुकवत मोबाइलने पतीला कॉल केला. त्यामुळे तिचा पतीने तिच्यासह दोन्ही मुलांची सोडवणूक केली. दरम्यान, त्यानंतर पीडिता ही स्वत:च्या गावात बाजारासाठी गेली असता, आरोपी तेथे आला. त्याने पीडितासह तिच्या पती, मुलांना मारण्याची धमकी दिली.