खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका? घरी आले निनावी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 01:40 PM2022-07-29T13:40:07+5:302022-07-29T13:58:28+5:30

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू; काही संशयीत व्यक्ती राजस्थान सीमेवरून अमरावतीत आल्याचे पत्रात नमूद

An anonymous letter about threat to MP Navneet Rana's life was received at her residence, suggest to aware | खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका? घरी आले निनावी पत्र

खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका? घरी आले निनावी पत्र

Next

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याबाबतचे निनावी पत्र गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे. काही संशयीत लोक राजस्थान सीमेवरून अमरावती येथे आल्याचे पत्रात नमूद आहे. ते खासदार राणांचा पाठलाग करीत असून, या निनावी पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. निनावी पत्र पाठविणारी व्यक्ती ही अमरावती येथील असून, ती खासदारांची ‘वेलविशर’ आहे. निनावी पत्राच्या सरतेशेवटी ‘खुदा हाफीस’ असा उल्लेख आहे. 

राणा दाम्पत्य गत काही दिवसांपासून सतत कोणत्या-कोणत्या विषयांवरुन चर्चेत आहेत. लोकसभेत तीन तलाक विषयाचे विधेयक, अमरावती येथे दोन गटात तणाव, हनुमान चालीसा पठण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट पंगा घेत जेलवारी देखील त्यांना करावी लागली. विशेषत : खासदार नवनीत राणा यांना केंद्र शासनाची झेड प्लस सुरक्षा आहे. त्या दिल्ली असोत वा गल्लीत चौफेर कंमाडोच्या सुरक्षा घेऱ्यात असतात. 

मात्र, निनावी पत्र पाठविणारी व्यक्ती ही अमरावती येथील रहिवासी असल्याचे सांगत आहे. एवढेच नव्हे तर तो शासकीय कर्मचारी आहे. खासदार राणांनी मला खुप मदत केली. बदली करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कोरोना काळात सुद्धा भरपूर सहकार्य मिळाले. तथापि काही संशयीत व्यक्ती राजस्थान सीमेवरून अमरावतीत आल्याचे पत्रात नमूद आहे. हे संशयीत लोक तुमच्या घरी येऊन रेकी करून गेले आहेत. पण माझी देवाला प्रार्थना आहे की आपल्यासोबत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये. खासदार मॅडम आपण असेच मोठे व्हा, अशी प्रार्थनादेखील निनावी पत्र पाठविणाऱ्या व्यक्तीने केली आहे. 

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी 

राणा यांच्या ‘गंगा सावित्री’ या निवासस्थानी आलेल्या पत्रानंतर आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. गत पाच दिवसात राणांच्या घरी कोण-कोण येऊन गेलेत, याचा कसून शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर पोलिसात तक्रार नोंदविली जाईल, असे आमदार रवी राणांच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितले. मात्र, निनावी पत्र आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच कार्यकर्त्यांनी निवासस्थानी एकच गर्दी केली.

Web Title: An anonymous letter about threat to MP Navneet Rana's life was received at her residence, suggest to aware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.