धनुर्विद्या प्रशिक्षणादरम्यान मुलाच्या चेहऱ्यात घुसला बाण अन्...; अमरावतीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 04:52 PM2022-11-25T16:52:50+5:302022-11-25T16:54:20+5:30
धनुर्विद्या प्रशिक्षण घेत असताना अपघात
येवदा - दर्यापूर (अमरावती) : दर्यापूर येथील शासकीय क्रीडा संकुलात धनुर्विद्या सराव करीत असताना बाजूला खेळत असलेल्या १५ वर्षीय बालकाच्या चेहऱ्यात बाण घुसल्याने तो रक्तबंबाळ झाला. बुधवारी दुपारी चार वाजता शासकीय क्रीडा संकुल येथे ही घटना घडली. सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे.
प्राप्त माहितीनुसार, सराव करीत असलेल्या विद्यार्थ्यांकडून बाण सुटला व तो बाजूला खेळत असणाऱ्या मुलास लागला. वेदांत गणेश डहाळे (१५) असे जखमीचे नाव आहे. तो आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी असून सातवीत शिकतो. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांना बाण काढण्यात यश आले.
दरम्यान, कुठल्याही प्रशिक्षणाच्या वेळी सुरक्षिततेसाठी प्रशिक्षक सोबत असणे अतिशय गरजेचे असते. मात्र, यावेळी शासकीय क्रीडा संकुलात प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणारे शिक्षक उपस्थित नसल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून प्रशिक्षक गायब झालेच कसे, असाही सवाल यानिमित्त विचारला जात आहे. याप्रकरणी कुठलीही तक्रार अद्याप कुठेही दाखल झालेली नाही.