वकिलाकडून महिलेचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न; सासऱ्याला पाठवले बदनामीकारक मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:54 PM2022-12-09T18:54:20+5:302022-12-09T18:55:14+5:30
पीडित महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा पोलिसांत दाखल कौटुंबिक छळाच्य गुन्ह्याची केस आरोपी ॲड. अनिल विश्वकर्मा हा पाहत होता
अमरावती - महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन येथील एका वकिलानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. १ जुलै २०१९ ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी ॲड. अनिल विश्वकर्मा (रा. वडाळी, अमरावती) याच्याविरूध्द बलात्कार, बदनामी तथा धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा पोलिसांत दाखल कौटुंबिक छळाच्य गुन्ह्याची केस आरोपी ॲड. अनिल विश्वकर्मा हा पाहत होता. फिर्यादीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला प्रेमजाळात ओढले. तिला अमरावतीत आणून येथील एका फार्महाउसवर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. दरम्यान, पीडिताला तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट मिळाल. पहिल्या पतीशी फारकत होऊन तिचे दुसरे लग्न झाले. त्यावेळी आरोपी ॲड. अनिल विश्वकर्मा याने तिच्या सासऱ्याला बदनामीकारक मजकुर पाठविला. त्यामुळे फिर्यादी व तिच्या पतीची बदनामी झाली.
आरोपी वकिलाच्या अशा वागण्यामुळे तिची सामाजिक बदनामी झाली. त्यामुळे आरोपीने आपली बदनामी करुन आपला संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालविल्याची तक्रार तिने बुलढाणा जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात नोंदविली. मात्र घटनास्थळ अमरावतीत असल्याचे तो गुन्हा फ्रेजरपुरा पोलिसांत वर्ग करण्यात आला. ८ डिसेंबर रोजी रात्री ९.१२ मिनिटांनी पोलिसांनी गुन्हयाची नोंद केली.
बुलढाणा जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यातून तो गुन्हा आमच्या पोलीस ठाण्यात वर्ग झाला. त्या प्रकरणी संबंधित वकीलाविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.
सोनाली मेश्राम, सहायक पोलीस निरिक्षक, फ्रेजरपुरा