हिला मारून टाक, चारच वर्षे जेल होईल पण आयुष्याची कटकट थांबेल; गर्भवती महिलेस मारहाण
By प्रदीप भाकरे | Published: July 16, 2023 02:21 PM2023-07-16T14:21:01+5:302023-07-16T14:21:07+5:30
अमरावतीत येऊन घातला धिंगाणा
अमरावती: हिला मारून टाक, आपल्याला फक्त चारच वर्षे जेल होईल, पण आयुष्याची कटकट थांबेल, अशा शब्दात धमकी देत एका आठ महिन्यांची गर्भवतीला बेदम मारहाण करण्यात आली. ९ मार्च रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरी हा प्रकार घडला. याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी संकेत व करतारसिंग (दोन्ही रा. चाळीसगाव) यांच्याविरूध्द मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पती व सासरच्या मंडळीने चालविलेला अनन्वित छळ व गर्भारपणामुळे चाळीसगाव येथील विवाहिता येथे माहेरी आली होती. दरम्यान ९ मार्च रोजी तिचा पती संकेत व कर्तारसिंग अमरावतीत आले. पत्नीचे माहेर गाठत दोघांनीही तिच्याशी वाद घातला. त्यावर आपण आठ महिन्यांची गर्भवती आहो, असे म्हणताच कर्तारसिंग तेथे आला. तथा संकेतला त्याने तिला मारण्यासाठी प्रोत्साहित केले. हिला मारून टाक, आपल्याला चार वर्षे जेल होईल. मात्र आपल्या आयुष्याची कटकट मोकळी होईल, असे म्हणून कर्तारसिंगने तिला शिविगाळ केली. तेवढयात संकेतने तिच्यावर दगड उचलला. मात्र ती फिरल्याने तो दगड तिला लागला नाही. त्यामुळे संकेतने मागून येऊन तिच्या कानावर जोरात बुक्की मारली. त्यामुळे तिच्या कानातून रक्त निघाले. ती खाली कोसळली. तपासणीदरम्यान त्या मारामुळे तिच्या कानाचा पडदा फाटल्याचे निदान केले.
दरम्यान, ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याने संबंधित खासगी डॉक्टरने तिचे ऑपरेशन केले नाही. तर गर्भारपण व बाळंतपणामुळे आपण वेळेत तक्रार करू शकलो नाही. पतीने कानावर मारल्यानेच आपल्या कानाचा पडदा फाटल्याची तक्रार त्या विवाहितेने १५ जुलै रोजी उशिरा रात्री फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली आहे.