घर तिथे वाहन जोरात.. अमरावतीच्या रस्त्यावर चार वर्षात २, ३०, ४९८ वाहनांची वाढ
By गणेश वासनिक | Published: August 22, 2023 03:41 PM2023-08-22T15:41:04+5:302023-08-22T15:41:37+5:30
२०१८ मध्ये ७०३४६४ लाख वाहने तर २०२३ मध्ये ९३३९६२ लाख वाहनांची नोंदणी
अमरावती : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आरटीओ मार्फत नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वाहन नोंदणी वरून दिसून येत आहे. कुटुंबाकडे आवश्यक गरज म्हणून वाहनाकडे पाहिल्या जात आहे. घर तिथे वाहन ही शहरी भागात नव्याने अस्तित्वात येणारी ओळख तयार झाली आहे. विकास आणि दळणवळणाच्या विस्ताराची चाके अधीक वेगाने धावू लागल्याचे चिन्ह आहे.
अमरावती जिल्ह्यात गत पाच वर्षाच्या तुलनेत या वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. २०१८ मध्ये वाहनाचा आकडा ७०३४६४ लाखात होता. २०२३ च्या जून अखेर पर्यंत तो वाढून ९३३९६२ इतक्या लाखात पोहोचला आहे. २०१८-१९ ते जून २०२३ अखेर दोन लाख तीस हजार ४९८ वाहनाची नव्याने पाच वर्षात भर पडलेली आहे.
सहज सोपी सुलभ वाहतुकीसाठी दुचाकी वाहने व चार चाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात या पाच वर्षात वाढलेला दिसून येतो आहे. आवश्यक गरज म्हणून घरा घरात दुचाकी व चारचाकी वाहने किमान दोन किंवा तीन पेक्षा जास्तच वाहने वाढलेली आहे. २०१८ मध्ये अमरावती जिल्ह्यात ६ लाख ५९ हजार ३५५ दुचाकी व चार चाकी वाहने होती. तर ट्रान्सपोर्ट विभागात वाहनांची संख्या ४४ हजार १०९ इतकी होती. २०२०-२०२१ ते २०२१-२०२२ या दोन वर्षात वाहन खरेदी सर्वसाधारण असल्याचे दिसून येते. मात्र त्यानंतर वाहन खरेदीत मोठया प्रमाणात वाढ झाली.
पाच वर्षात या वाहनांची पडली भर ( २०१८ ते जून २०२३)
१) दुचाकी - १७७९७५
२) कार,जीप - २२६७८
३) ऑटो रिक्षा - ४२६५
४) मिनीबस- ९६
५) स्कूल बस- १४०
६) ट्रक,लोरी- २७१७
७) डिलिव्हरी व्हॅन तीन चाकी चार चाकी- ३९७८
७) ट्रॅक्टर- ७५७८
९) ट्रॉली - १५३५
१०) ॲम्बुलन्स - १०३
११) इ-रिक्षा (पब्लिक अँड गुड्स)-८३
१२) लक्झरी टुरिस्ट बस-६१
१३) टॅक्सी-६१
१४) इतर वाहने - ७४८
वाहनधारकांनी वाहने हाताळताना विशेष काळजी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. सदैव हेल्मेट घालूनच वाहन चालवावे. ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे त्यांनीच वाहन हेल्मेट घालून चालवावे. कमी वयाच्या मुलांना वाहने हाताळण्याकरिता देऊ नये, याची विशेष काळजी पालकांनी घ्यावी.
- राजाभाऊ गीते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती