महाराष्ट्र देशासाठी प्रेरणा; प्रयोगशाळा होऊ देऊ नका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 11:08 AM2024-11-13T11:08:35+5:302024-11-13T11:10:21+5:30
योगी आदित्यनाथ यांचे आवाहन : परतवाडा येथे प्रचार सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : महाराष्ट्र देशासाठी प्रेरणास्रोत राहिले आहे, सतत राहील. या राज्याला प्रयोगशाळा होऊ द्यायची नाही. हे आता तुमच्या हाती आहे. एक चूक काँग्रेसच्या 'हाता'ने १९४७ मध्ये केली. आपल्या स्वार्थासाठी मुस्लीम लीगसारख्या संघटनांशी समझोता करून देशाचे विभाजन केले गेले. आतादेखील 'बटेंगे तो कटेंगे' हे लक्षात ठेवा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परतवाडा येथे मतदारांना केले. अचलपूर, मेळघाट व मोर्शी मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची यावेळी सभा झाली.
योगी पुढे म्हणाले, २०१४ पूर्वी पाकिस्तान, चीन भारतात शिरत होता. ठिकठिकाणी विस्फोट घडून येत होते. मी आवाज उठवत होतो, तर त्यावेळी काँग्रेसचे सरकार आणि यूपीएचे नेते 'तुम्ही बोलू नका, आमचे संबंध खराब होतील' असे बजावत होते. आता आपण बघत असाल, ये नया भारत है. आता जर कोणी अशी गडबड केली, तर त्याची एकच यात्रा निघते, ती आहे राम नाम सत्य है.
भाजपचे अचलपूर मतदारसंघाचे उमेदवार प्रवीण तायडे, मेळघाटचे उमेदवार केवलराम काळे व मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार उमेश यावलकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी आयोजित योगी आदित्यनाथ यांच्या सभेत मंचावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार नवनीत राणा, खा.डॉ. अनिल बोंडे, सुनील खानजोडे, कुंदन यादव यांसह मान्यवर आणि तिन्ही उमेदवार उपस्थित होते.
अयोध्यात या, आम्ही स्वागत करू
योगी आदित्यनाथ म्हणाले, तुमच्यापैकी किती जण आतापर्यंत अयोध्याला आले आहेत? हात कमी उंचावल्याचे बघून ते म्हणाले, तुम्ही अयोध्याला या, आम्ही तुमचे स्वागत करू. यावेळी 'जय श्रीराम'चे नारे निनादले.
खरगेजी, में एक योगी हूँ
मागील तीन दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माझ्यावर खूप नाराज होत आहेत. मी अशा शब्दांचा वापर का करीत आहे? मी त्यांना सांगू इच्छितो की, खरगेजी मी एक योगी आहे और माझ्यासाठी देश प्रथम आहे. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही हीच दृष्टी आहे, तर काँग्रेस तुष्टीकरणाच्या नीतीवर विसंबून आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.