पोलिसाचा ऑनड्यूटी आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:49 AM2023-06-19T10:49:28+5:302023-06-19T10:52:20+5:30
प्रकृती धोक्याबाहेर : बयाणाची प्रतीक्षा
अमरावती : नांदगाव टोलनाक्यानजीक एका पोलिस अंमलदाराने ऑनड्यूटी आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री १० च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. सतीश महल्ले (बक्कल नंबर ३९०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांची प्रकृती तूर्तास धोक्याबाहेर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी सुसाइड अटेम्प्ट’ का केला, ते स्पष्ट होऊ शकले नाही. बयाणानंतर कारणाचा उलगडा होईल.
गोवंश तस्करीला लगाम लावण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी व चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. मुख्यालयात कार्यरत सतीश महल्ले यांना नांदगाव पेठ टोलनाक्यावरील नाकाबंदी पॉइंटवर तैनात करण्यात आले होते. रात्री १० च्या सुमारास महल्ले यांनी त्या पॉइंटच्या बाजूलाच एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. लघुशंकेला गेलेल्या एका व्यक्तीच्या निदर्शनास तो प्रकार आला. त्याने आरडाओरड करून ती बाब तेथे उपस्थित टोल कर्मचारी व अन्य जणांच्या लक्षात आणून दिली. काही प्रत्यक्षदर्शींनी महल्ले यांना तत्काळ गळफास घेतलेल्या स्थितीतून खाली काढत प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात व पुढे बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती बाब कळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळासह रुग्णालयदेखील गाठले. नांदगाव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे यांनीदेखील रुग्णालय गाठून डॉक्टरांशी चर्चा केली. महल्ले यांच्यावर त्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्याने टोल नाका परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. तूर्तास त्यांची प्रकृती बरी असल्याचे कळले. बयाण घेणे बाकी आहे. बयाणाअंती सुसाइड अटेम्प्टचा उलगडा होईल.
- प्रवीण काळे, ठाणेदार, नांदगाव पेठ