तळेगाव दशासर येथील प्राचीन मूर्ती ठेवणार वास्तू संग्रहालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:23+5:302021-07-05T04:09:23+5:30
फोटो - इंदल चव्हाण यांच्याकडे वाहनाने अमरावतीला केल्या रवाना, उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली होती पाहणी नीलेश रामगावकर तळेगाव दशासर : धामणगाव ...
फोटो - इंदल चव्हाण यांच्याकडे
वाहनाने अमरावतीला केल्या रवाना, उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली होती पाहणी
नीलेश रामगावकर
तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील प्राचीन शिल्पकलेचा वारसा सांगणाऱ्या मूर्ती व इतर पुरातन वस्तू वाहनाने अमरावती येथे शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आल्या. तहसीलदार गौरव भळगाठिया यांच्या नेतृत्वात ही मोहीम फत्ते करण्यात आली. या मूर्तींची उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पाहणी करून त्यांचे महत्त्व पुरातत्त्व विभागाकडून अधोरेखित करण्यात आले होते.
तळेगाव दशासर या गावाला पुरातन वारसा लाभला आहे. परिसरातील सर्वात प्राचीन काळात वसलेले हे गाव आहे. येथील पुरातन वास्तू, शिल्पकलेचे उत्तम नमुने असलेल्या अनेक देवतांच्याच्या मूर्ती या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. पाण्यावर तरंगनाऱ्या विटा आजही परिसरात आढळतात. याशिवाय पायऱ्यांच्या विहिरी तर शिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना ठरल्या आहेत. येथील मूर्ती व पुरातन साहित्य अमरावती येथे तयार होत असलेल्या पुरातन वास्तू संग्रहालयाची शोभा वाढवतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
तीन महिन्यांपूर्वी निरीक्षण
सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पाटील यांनी येथील दगडी मंदिरासह प्राचीन वास्तूंची व पुरातन काळातील इमारतींची पाहणी केली होती. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या निदर्शक असलेल्या, मात्र आता सुट्या स्वरूपात इतस्त: विखुरलेल्या मूर्ती एकत्र करून जिल्हा मुख्यालयी आणण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला होता.
शुक्रवारी रवाना झाल्या वस्तू
तळेगाव येथील प्राचीन काळातील मूर्ती, काळा पाषाणात कोरलेले खांब आदी पुरातन वस्तू २ जुलै रोजी ट्रकमध्ये एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयात निर्माण होणाऱ्या प्राचीन वास्तू संग्रहालयात जनतेच्या अवलोकनासाठी शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत तहसीलदार गौरव भळगाठिया यांनी उपस्थित राहून हे कार्य पूर्ण केले.
----------------------
जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील ऐतिहासिक व पुरातत्त्व गावातील प्राचीन वास्तूंना एकत्रित करून जिल्हा मुख्यालयातील जागेवर ठेवण्यात येणार आहेत. जनतेला या पुरातन वास्तूचे दर्शन करण्यासाठी एका संग्रहालयाची निर्मिती करण्यात येईल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाने जिल्ह्याचे नाव व प्राचीन संग्रहाला नवीन चालना मिळेल.
- गौरव भळगाठिया, तहसीलदार, धामणगाव रेल्वे
----------