अन् बोलू लागले प्राण्यांचे सांगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 12:04 AM2017-06-15T00:04:54+5:302017-06-15T00:04:54+5:30
कठोरा मार्गावरील एका शेतशिवारात मंगळवारी पाच वन्यप्राण्यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला.
वनविभाग अनभिज्ञ : विद्युत प्रवाहित तारांमुळे यापूर्वीही अनेक मृत्यू?
वैभव बाबरेकर। लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कठोरा मार्गावरील एका शेतशिवारात मंगळवारी पाच वन्यप्राण्यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर याच परिसरात आणखी काही वन्यप्राण्यांचे सांगाडे आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे हे सत्र बरेच आधीपासून सुरू असल्याचे दिसून येते. मृत वन्यपशुंचे सांगाडेच जणू त्यांची आपबिती कथन करीत आहेत.
मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास वनविभागाला मृत वन्यप्राण्यांबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
वनविभागाने पंचनामा करून शेतमालकावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वन्यपशुंचे घटनास्थळीच शवविच्छेदन करून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. ही प्रक्रिया सायंकाळपर्यंत चालली. ही प्रक्रिया सुरू असताना वनविभागाला घटनास्थळापासून काही अंतरावर असणारे वन्यप्राण्यांचे सांगाडे देखील दिसून पडलेत. यामुळे याठिकाणी यापूर्वी देखील वन्यपशुंचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची बाब उघड झाली आहे.
वन्यप्राणी अन्न-पाण्याच्या शोधात शहरालगत शेतशिवारांपर्यंत पोहोचतात.
शेतीच्या धुऱ्यावर लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन अनेकदा ते दगावतात. या घटना यापूर्वी देखील घडल्या असाव्यात, असे येथे आढळलेल्या वन्यपशुंच्या सांगाड्यावरून दिसून येते.
संजय महल्लेला न्यायालयीन कोठडी
शेतमालक संजय महल्ले यांनी शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडला होता. यातारांचा स्पर्श झाल्याने पाचही वन्यप्राणी दगावले. वनविभागाने याप्रकरणी संजय महल्लेला बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
वीज वितरण कंपनीकडेही तक्रार
शेताजवळील विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेऊन विजेचा प्रवाह कुंपणात सोडण्यात आला होता. शेतात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन्यपशुंना विजेचा धक्का बसला व त्यांचा मृत्यू झाला. शेतमालक महल्लेने अनधिकृत वीजजोडणी घेतल्याचा संशय वनविभागाला असून यासंदर्भात त्यांनी विज वितरण कंपनीकडे तक्रार सुध्दा केली आहे. वीजजोडणी अनधिकृत आढळल्यास वीज कंपनीकडूनही संजय महल्लेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
कास्तकारांना पुन्हा देणार सूचना
जंगलाशेजारच्या शेतांमध्ये शिरून वन्यप्राणी पिकांचे नुकसान करतात. यासाठी शेतमालक कुंपणात विद्युत प्रवाह सोडतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. हा गंभीर प्रकार वनगुन्ह्यात मोडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या धुऱ्यावर विद्युत तारा लावू नयेत, याबाबत वनविभागाकडून शेतकऱ्यांना सातत्याने सूचना देण्यात येतात. मात्र, तरीही हे प्रकार घडत असल्याने पुन्हा जंगलालगतच्या शेतकऱ्यांना सूचना देण्यात येणार आहे.
विद्युतप्रवाहित तारांचा स्पर्श झाल्यामुळे पाचही वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. घटनास्थळी आढळलेले वन्यप्राण्यांचे सांगाडेही जप्त केले आहेत.
- एच.व्ही.पडगव्हाणकर,
वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी.