अन् सावलीनेही सोडली साथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:08 PM2018-05-25T23:08:00+5:302018-05-25T23:08:44+5:30
अन्य कोणीही साथ सोडली तरी सावली मात्र कधीच माणसाची साथ सोडत नाही. म्हणूनच कोणा व्यक्तीने दिलेल्या अव्याहत साथीला सावलीची उपमा दिली जाते. शुक्रवार, २५ मे रोजी मात्र या सावलीने अमरावतीकरांची साथ सोडली. निमित्त होते झिरो शॅडो डे अर्थात शून्य सावली दिनाचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अन्य कोणीही साथ सोडली तरी सावली मात्र कधीच माणसाची साथ सोडत नाही. म्हणूनच कोणा व्यक्तीने दिलेल्या अव्याहत साथीला सावलीची उपमा दिली जाते. शुक्रवार, २५ मे रोजी मात्र या सावलीने अमरावतीकरांची साथ सोडली. निमित्त होते झिरो शॅडो डे अर्थात शून्य सावली दिनाचे.
विशिष्ट खगोलीय परिस्थितीमुळे सूर्य डोक्यावर येऊन काही काळासाठी सावली गायब होते अर्थात पायाखाली एकवटते. त्याला झीरो शॅडो डे असे म्हटले जाते. मागील काही दिवसांपासून राज्यभरात निरनिराळ्या दिवशी निसर्गाचा हा आविष्कार अनुभवास आला. अमरावतीमध्ये शुक्रवारी नागरिकांनी त्याचा प्रत्यय घेतला. दुपारी १२ वाजता प्रखर ऊन जाणवत होते. यादरम्यान व्यक्ती व वस्तूची सावली तिच्या आसपास दिसत होती. मात्र, १२.३० वाजता सावली जवळपास गायब झाल्याचे अनुभव नागरिकांनी घेतला. दुपारी १ वाजेपर्यंत सूर्यकिरणे थेट डोक्यावर पडत असल्याने अर्धा तास सावलीनेही साथ सोडली होती.
अनेकांनी भर उन्हात घराबाहेर येऊन हा प्रकार अनुभवला. विशेषत: चिमुकल्यांंनी या प्रकाराची चांगलीच मौज लुटली. ज्येष्ठांनी घरातील मुलांना निसर्गाचा आविष्कार दाखवला. सावली गायब झाल्याने नागरिकांमध्ये निसर्गाबद्दलचे कुतूहल पाहायला मिळाले.
का झाली सावली गायब?
सूर्याचे उत्तरायण ते दक्षिणायन प्रवासातील दोन दिवस सूर्य पृथ्वीच्या अगदी मध्यावर येतो. सूर्यकिरणे थेट सरळ पडत असल्याने प्रत्येक वस्तूची सावली गायब झाल्यासारखी वाटते. २३ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत सूर्याचे उत्तरायण सुरू राहणार आहे. यंदाचा शून्य सावलीचा दिवस हा उत्तरायण प्रवासामधील असून, पुढील दक्षिणायन सुरू झाल्यावर पुन्हा असा दिवस अनुभवता येणार आहे.
सोशल मीडियावर फोटो
सोशल मीडियावरही झीरो शॅडो डे चांगलाच गाजला. अनेक तरुण-तरुणींनी आपली सावलीविरहित छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केली. अनेकांच्या फेसबुक व्हॉट्स अॅपच्या डीपीवर ही छायाचित्रे झळकत होती.