अन्‌ त्यांचा आनंद गगनात मावेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:08+5:302021-08-17T04:19:08+5:30

अमरावती : घरात टीव्ही पाहत असलेला काळजाचा तुकडा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात रडारड अन्‌ बाहेर ...

And their happiness is in the sky! | अन्‌ त्यांचा आनंद गगनात मावेना!

अन्‌ त्यांचा आनंद गगनात मावेना!

Next

अमरावती : घरात टीव्ही पाहत असलेला काळजाचा तुकडा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात रडारड अन्‌ बाहेर शोधाशोध सुरू झाली. गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याही कानावर ही चिंतनीय बाब टाकण्यात आली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलविली. खबरे कामाला लावले. सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली. त्याचा परिपाक म्हणून अवघ्या ४ तासात त्या चिमुकल्याला शोधण्यात यश आले. तो ११ वर्षीय चिमुकला पालकांच्या कुशीत सुखरूप पोहोचला. अन्‌ त्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. पोलीस नव्हे देवदूतच, असे शब्द आपसुक त्यांच्या तोंडातून बाहेर पडले.

विलासनगर गल्ली क्रमांक ३ येथे एक डॉक्टर पत्नी, मुलासह राहतात. १४ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० ते ३.३० च्या सुमारास त्यांच्या पत्नी किचनमध्ये काम करीत होत्या. त्यांचा ११ वर्षीय मुलगा घरात टीव्ही पाहत होता. किचनमधील काम आटोपून त्या टीव्हीच्या खोलीत आल्या असता, त्यांना मुलगा दिसला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली. नातेवाईकांकडेदेखील विचारणा करण्यात आली. मात्र, तो न मिळाल्याने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

पथक लागले कामाला

फोनद्वारे माहिती मिळताच, गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात पोलीस पथक त्या मुलाचा शोध घेण्यास सरसावले. त्याच्याच घराजवळ असलेल्या सीसीटीव्हीत तो दुपारी ३.५० च्या सुमारास घराबाहेर पडल्याचे लक्षात आले. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनीदेखील चोरमले यांना दिशार्निदेश दिलेत.

गोपाळपुरनजीक असल्याची खबर

तो ११ वर्षीय मुलगा कठोरा नांदुरा मार्गावरील गोपाळपूर फाट्यावर अनवाणी पायाने फिरत असल्याची माहिती गाडगेनगर ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल प्रशांत भोंडे यांना मिळाली. गोपाळपूरच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधून खात्री करण्यात आली. पीआय चोरमले यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक इंगोले, उपनिरीक्षक खंडारे, हेकाँ गवई, सुभाष पाटील, नीलेश वंजारी, रोशन वर्हाडे, प्रशांत भोंडे गोपाळपूरला पोहोचले. रात्री ८ च्या सुमारास त्या मुलाला त्याच्या कुटुंबीयांच्या सुखरूप स्वाधीन करण्यात आले. ऑनलाईन क्लासेसमुळे तोे घराबाहेर पडल्याचे लक्षात आले.

Web Title: And their happiness is in the sky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.