अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात
By admin | Published: February 16, 2017 12:13 AM2017-02-16T00:13:34+5:302017-02-16T00:13:34+5:30
राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचे मानधन आयुक्तालय स्तरावरून पीएफएमएस
‘पीएफएमएस’ प्रणाली : महिला, बालविकास विभागाचे निर्देश
अमरावती : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचे मानधन आयुक्तालय स्तरावरून पीएफएमएस (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम) या प्रणालीद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. हीप्रणाली तातडीने कार्यान्वित करण्यात यावी, असे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.
आयुक्तालयस्तरावर राज्यातील सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची एकत्रित हजेरी व त्याद्वारे देयक तयार करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्यासाठी आयुक्तालयाने खासगीरित्या विकसित केलेल्या संगणक प्रणालीमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाने सुचविलेले बदल विचारात घेऊन त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आयुक्तालयाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीमध्ये राज्यातील सर्व सेविका, मदतनिस यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, आहरण व सवितरण अधिकारी यांची माहिती अपलोड करण्यात यावी. मुंबई प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे फेब्रुवारी २०१७ चे मानधन पीएफएमएस प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावे. तसेच राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मार्च २०१७ मधील मानधन प्रायोगिक तत्वावर त्यांच्या बँक खात्यात पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट जमा करण्यात यावे. मात्र एप्रिल २०१७ पासून अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन पीएफएमएस प्रणालीद्वारेच अदा करण्यात येणार आहे.
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संचालक, माहिती तंत्रज्ञान व संचालक लेखा व कोषागारे यांच्याशी समन्वय ठेऊन पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधन अदा करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निवारण करून घ्यावे.
तथापि मार्च २०१७ अखेरपर्यंत सदर प्रणाली पूर्णपणे राज्यात कार्यान्वीत होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहे.राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन जिल्हास्तरावरून आहरित करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट प्रणालीद्वारे थेट जमा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने मान्यता देण्यात आली होती. आता केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन पीएफएमएस या प्रणालीद्वारे प्रदान करण्याबाबत सूचित केले आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवायोजना यांनी मानधनाची रक्कम आयुक्तालय स्तरावरून एकत्रित गोषवारा पद्धतीने आहरित करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफएमएस (पब्लिक फायनांन्शियल मॅनेजमेंट सिस्टीम) या प्रणालीद्वारे थेट जमा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन वेळेत मिळण्यासाठी व मानधन वाटप कामकाजात पारदर्शकता राहण्यासाठी पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधन प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)