अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप
By admin | Published: March 21, 2017 12:19 AM2017-03-21T00:19:35+5:302017-03-21T00:19:35+5:30
शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी सोमवार २० आणि मंगळवार २१ मार्च अशा दोन दिवसांच्या संपावर आहेत.
आंदोलन : जिल्हा कचेरीसमोर धरणे
अमरावती : शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी सोमवार २० आणि मंगळवार २१ मार्च अशा दोन दिवसांच्या संपावर आहेत. या संपादरम्यान अंगणवाडी कर्मचारी व सेविकांकडून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सतत आंदोलनाच्या माध्यमातून मानधनवाढ व अन्य प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने समिती गठित केली आहे. महिला बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आयटक व संयुक्त कृती समिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देऊन मानधनवाढ व अन्य प्रलंबित मागण्यांबाबत शासन निर्णय काढण्याचे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले होते. मात्र शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. आयटक व संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून नुकताच मुंबई येथे मोर्चादेखील काढण्यात आला. मात्र मानधनवाढ व अन्य मागण्या निकाली काढण्यासाठी शासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आयटकच्यावतीने सोमवार २० आणि मंगळवार २१ मार्चला दोन दिवसांचा संपाचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये बी. के. जाधव, प्रमिला राव, मिरा कैथवास, ममता सुंदरकर व अन्य अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत. (प्रतिनिधी)