माहिती भरण्यासाठी अंगणवाडीसेविकांना इंग्रजी शिकवण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:13 AM2021-07-31T04:13:40+5:302021-07-31T04:13:40+5:30
पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मराठी नाही, इंग्रजी येत नसल्याने माहिती भरताना अडचणी अमरावती : स्तनदा माता, गरोदर महिला आणि मुलांची ...
पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मराठी नाही, इंग्रजी येत नसल्याने माहिती भरताना अडचणी
अमरावती : स्तनदा माता, गरोदर महिला आणि मुलांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले आहे. त्या सर्वांची माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये भरावयाची आहे. मात्र, ती सर्व इंग्रजी भाषेत भरावी लागत असल्याने अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहे. इंग्रजी येत नसल्याने आता आम्ही यासाठी या वयात इंग्रजी शिकायची का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यात अनेक दुर्गम भागात रेंज नसल्याने ही माहिती भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अंगणवाडी सेविकांमार्फत जिल्ह्यातील स्तनदा माता, गरोदर महिला तसेच कुपोषित मुलांना अंगणवाडीच्या माध्यमातून सेवा दिली जाते. त्यांना पोषण आहार देण्यासोबतच त्यांची सर्व माहिती अंगणवाडी सेविकांना ठेवावी लागते. जिल्ह्यात सुमारे २ हजार ६४३ अंगणवाडी केंद्र आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. अंगणवाडी सेविकांचे काम स्मार्ट करण्यासाठी तसेच सर्व माहिती एका क्लिकवर मिळावी, या उद्देशाने अंगणवाडी सेविकांना राज्याच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत मोबाईल देण्यात आले आहेत. आधी कॅश या ॲपवर गरोदर माता स्तनदा आणि लहान मुलांची माहिती भरावी लागत होती. मात्र, हे ॲपच बंद पडले. त्यानंतर आला पोषण आहार ट्रॅकर हे नवे ॲप बनविण्यात आले असून, त्यावर ही माहिती अंगणवाडी सेविकांना भरावी लागत आहे. मात्र, ही माहिती इंग्रजीत भरावी लागत असल्याने इतरांची मदत घ्यावी लागत आहे.
बॉक्स
मोबाईल आहे पण रेंज नाही
जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्यातील अनेक गावे ही दुर्गम भागात आहेत. डोंगराळ प्रदेश, त्यात मोबाईल टाॅवरची कमतरता. यामुळे या ठिकाणी मोबाईलला दिवसभर रेंज नसते. त्यामुळे या मोबाईलचा काहीच उपयोग होत नाही. त्याचे इंटरनेट नसल्यामुळे ही माहिती अंगणवाडी सेविकांना भरताना अडचणी येत आहे. त्यांना रेंज असलेल्या ठिकाणी येऊन ॲपवर ही माहिती भरावी लागत आहे.
बॉक्स
पोषण ट्रॅक्टरवरील कामे
जिल्ह्यातील गरोदर महिलांची स्तनदा माता, किशोरवयीन मुले-मुली त्यांचे वजन यासारखी माहिती अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकवर भरण्याच्या सूचना आहेत. यासाठी त्यांना मोबाईल देण्यात आले आहेत. राज्य शासनाला जिल्ह्याची माहिती एका क्लिकवर मिळावी, हा यामागील उद्देश आहे.
कोट
ट्रॅकर ॲपवरील माहिती मराठीत विकसित करण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा ट्रॅकवर माहिती भरण्याचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. यात १०० टक्के नोंदणी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
- प्रशांत थोरात,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण
बॉक्स
आम्हाला इंग्रजी कशी येईल?
कोट
शासनाची योजना प्रत्येक वेळी चांगलीच असते. मात्र, त्यासाठी पूर्वनियोजन आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागाचा कधी विचार केला जात नाही. त्यामुळे योजना चांगली असतानाही त्याची अंमलबजावणी करताना अडचणी जात आहेत. अंगणवाडी सेविकांना पोषण आहाराची संबंधित माहिती भरण्यासाठी पोषण ट्रॅकवर पुरविण्यात आले आहेत. मात्र, गावांमध्ये कधी रेंज नसते. अशावेळी अंगणवाडी सेविकांना काय करावे हेच कळत नाही.
अंगणवाडी सेविका
कोट
कोरोना संकट काळात अनेक अडचणीवर मात करून अंगणवाडी सेविकांनी काम केले. आता पोषण आहार तसेच इतर माहिती पोषण ट्रॅकर ॲपवर भरावी लागत आहे. दुर्गम भागात मोबाईलला रेंज नसते कधी मोबाईल मध्ये रिर्चाज नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- अंगणवाडी सेविका
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या -२६६४५
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका -२६६४५