‘त्या’ चिमुकलीला मिळाले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:02 AM2018-05-04T01:02:19+5:302018-05-04T01:02:19+5:30
जीवन-मरणाच्या चक्रात अडकलेल्या साडेपाच वर्षीय श्रेया तांबट या चिमुकलीवर शस्त्रक्रिया करून तिच्या शरीरात सीएपीडी कॅथेटर बसविण्यात आले. या शस्त्रक्रियेतून तिला जीवदान मिळाले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात प्रथमच करणअयात आली.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जीवन-मरणाच्या चक्रात अडकलेल्या साडेपाच वर्षीय श्रेया तांबट या चिमुकलीवर शस्त्रक्रिया करून तिच्या शरीरात सीएपीडी कॅथेटर बसविण्यात आले. या शस्त्रक्रियेतून तिला जीवदान मिळाले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात प्रथमच करणअयात आली.
बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव (ता. शेगाव) येथील रहिवासी स्वप्निल तांबट यांची मुलगी श्रेया हिचे किडनी फेल्युअरचे निदान झाले. महागडे उपचार परवडत नसतानाही अमरावतीसह विविध ठिकाणी उपचार करण्यासाठी स्वप्निल तांबट यांनी धावपळ केली. तिच्या रक्तातील क्रिएटीनीनचे प्रमाण ८ होते, तर युरियाचे प्रमाण २१३ मिली (सामान्य ८८-१२८ मिली) वाढल्याने तिला सतत उलट्या, मळमळ, लघवीचा त्रास होता. ग्लानीमुळे ती जवळपास बेशुद्धावस्थेला पोहोचली होती. अशा स्थितीत श्रेयाला येथील शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोनोग्राफी अहवालानुसार तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. मात्र, एवढ्या लहान वयात डायलिसीस शक्य नव्हते आणि तांबट कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत होती.
सीएपीडी कॅथेटर म्हणजे काय?
किडनी फेल्यूअरमुळे डायलिसीस प्रक्रिया एवढ्याशा मुलीवर करता येत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी अँब्यूलेटरी पॅरेटोनिक डायलिसीस कॅथेटर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. या शस्त्रक्रियेला पॅरेटोनिक डायलिसीस असे सुटसुटीत नाव आहे. या शस्त्रक्रियेनंतर श्रेयाच्या रक्तातील युरियाची पातळी सामान्य झाली. मंदावलेली भूक वाढली आहे. शारीरिक व मानसिक पातळीवर ती सुदृढ होत आहे.
आई देणार डायलिसीस
श्रेया तांबट आता सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकणार आहे. मात्र, तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डायलिसीस करणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांनी तिच्या आईला ही प्रक्रिया समजावून सांगितली. स्वत:च्या घरी दिवसातून दोन वेळा तिच्या पोटात तीन तास पोटात पाणी सोडणे व बाहेर काढण्याची प्रक्रिया करावी लागेल. ही प्रक्रिया तिची आई करू शकेल.
भविष्यात करावे लागेल किडनी प्रत्यारोपण
श्रेयाला पुढील आयुष्यात किडनी प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. सध्या तिचे वय कमी असल्याने ही शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. किडनी प्रत्यारोपणानंतर ती सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकेल.