संतप्त नागरिकांचा वीज वितरण कार्यालयाला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:42+5:302021-05-21T04:13:42+5:30
फोटो पी २० नांदगाव पेठ नांदगांव पेठ : मंगळवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील संतप्त नागरिकांनी वीज वितरण ...
फोटो पी २० नांदगाव पेठ
नांदगांव पेठ : मंगळवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला. तीन आठवड्यांपासून सतत खंडित होणारा विद्युतपुरवठा तसेच नागरिकांना मिळत नसलेली सुविधा याबाबत सहायक अभियंता अंकुश ठाकरे यांना नागरिकांनी जाब विचारत भविष्यात चांगल्या सेवेची अपेक्षा व्यक्त केली.
तीन आठवड्यांपासून नांदगाव पेठ परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार वाढला होता. अनेकदा तक्रार करूनही कोणताच फरक न पडल्याने नागरिक संतप्त झाले होते. त्यात मंगळवारी केवळ अर्धा तास पाऊस व वादळवारा आल्याने सायंकाळी ६ वाजतापासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामध्ये अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद राहिल्याने नागरिकांचा संताप आणखीनच वाढला. रात्रभर वीजपुरवठा खंडित असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. कोविडसारख्या स्थिती काही कोरोना रुग्ण तसेच क्वारंटाईन असलेले नागरिक यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजता गावातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मोरेश्वर इंगळे, शशी बैस, आनंद लोहोटे, मंगेश तायडे, किशोर नागापुरे आदींनी सहायक अभियंता अंकुश ठाकरे यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नागरिकांनी बेशरमचे झाड लावून निषेधदेखील व्यक्त केला. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय चौधरी, मोहन शेदरकर, राहुल राऊत, ओम जवके, मंगेश गाडगे, संजय पकडे, धीरज गिरे, अंकुश राऊत, अनंता भुस्कडे, रुपेश पाटील, नयन इंगळे, बाळा दलाल, शुभम देशमुख, प्रकाश सोळंके आदी उपस्थित होते.
बॉक्स
नांदगाव पेठला स्वतंत्र फिडर
स्थानिक वीज वितरण कार्यालयावर धडक दिल्यानंतर नागरिक अमरावती येथील मुख्य कार्यालयावरही धडकले. कार्यकारी अभियंता उज्ज्वल गावंडे यांनी नागरिकांना शांत करीत लवकरच नांदगाव पेठसाठी स्वतंत्र फिडरची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.