संतप्त शेतकऱ्याचा विद्युत कार्यालयावर हल्ला
By admin | Published: June 19, 2015 12:38 AM2015-06-19T00:38:03+5:302015-06-19T00:38:03+5:30
सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला कंटाळून येथील एका संतप्त शेतकऱ्याने थेट विद्युत कार्यालयावर हल्ला चढविला.
नांदगाव पेठ : सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला कंटाळून येथील एका संतप्त शेतकऱ्याने थेट विद्युत कार्यालयावर हल्ला चढविला. गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला. या घटनेत संगणक, प्रिंटरसह अन्य साहित्याची नासधूस झाली.
येथील शेतकरी तथा माजी सरपंच उदय भुस्कडे सकाळी शेतामध्ये गेले असता त्यांना कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी लगेच अभियंता राठोड यांना भ्रमणध्वनीवर सूचना देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. मात्र, एकही कर्मचारी वेळेवर न पोहोचल्याने भुस्कडे यांनी थेट विद्युत कार्यालय गाठून लोखंडी पाईपने तोडफोड करण्यास सुरूवात केली. यामध्ये संगणक व प्रिंटरसह अन्य साहित्याची नासधूस झाली. जवळपास चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळातच सहाय्यक पोलीस आयुक्त महेश जोशी, एपीआय एल. एम. गवंड सह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता. मात्र पोलिसात तक्रार दाखल न करण्यात आल्याने पुढील कार्यवाही झाली नाही. गेल्या अनेक दिवसापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुस्कडे यांनी हल्ला चढविल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी या कृत्याचे समर्थन केले असले तरी विद्युत विभाग यावर काय उपाययोजना करते हे महत्त्वाचे ठरेल. (प्रतिनिधी)