थेंबभर पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची आर्त हाक !

By admin | Published: April 3, 2017 12:12 AM2017-04-03T00:12:30+5:302017-04-03T00:12:30+5:30

विदर्भातला उन्हाळा म्हणजे जीवाची काहिली करणारा. डोईवर प्रखर तापणारा सूर्य. आसपास दाहक वातावरण, निष्पर्ण होत चाललेले वृक्ष, कोरडे पडत चाललेले जलसाठे......

Animal-Birds Art Call for Flame! | थेंबभर पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची आर्त हाक !

थेंबभर पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची आर्त हाक !

Next

जलसाठे होताहेत कोरडे : सिमेंटच्या जंगलात वन्यजीवांची तगमग, जनजागृतीची गरज
अमरावती : विदर्भातला उन्हाळा म्हणजे जीवाची काहिली करणारा. डोईवर प्रखर तापणारा सूर्य. आसपास दाहक वातावरण, निष्पर्ण होत चाललेले वृक्ष, कोरडे पडत चाललेले जलसाठे..या सगळ्यांचा परिणाम संपूर्ण सृष्टीवर जाणवतेय. मग, इवल्या-इवल्या पक्ष्यांची आणि प्राण्यांची कथा ती काय, सिमेंटच्या जंगलात थेंबभर पाण्यासाठी तगमगणारे पक्षी आणि पाण्याच्या एका घोटासाठी भरकटणारे पशू पाहिले की अंगावर सर्रकन काटा येतो. पशू-पक्ष्यांनी पाण्यासाठी दिलेली मूक आर्त हाक मनुष्यांपर्यंत पोहोचणे खरे गरजेचे आहे.
शहरीकरणासाठी सर्रास वृक्षांच्या कत्तली झाल्यात. सगळीकडे सिमेंटची जंगले उभी राहिलीत. पक्ष्यांचा हक्काचा निवाराच हरवला. जी काही मोजकी झाडे आहेत, ती तप्त उन्हामुळे निष्पर्ण झाली आहेत. कमालीच्या तापमानामुळे मनुष्याच्याच जीवाची काहिली होत असताना बिचाऱ्या मूक पशू-पक्ष्यांचे काय होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. पशू-पक्ष्यांना जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे.
मानव भौतिक सुखांच्या मागे लागला आहे. जगणे डिजिटल झाले आहे. सिमेंटचे जंगल वेगाने फोफावत आहे. मात्र, यामुळे निसर्गाचे संतुलन वेगाने ढासळतेय. पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने हवामानाचे तंत्रही बिघडले आहे. पशू-पक्षी नामशेष होताहेत. निसर्गाचे संतुलन तोलण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे पशू-पक्षी जगण्यासाठी धडपडत आहे. मात्र, दग्ध उन्हाळ्यात पाण्याच्या थेंबासाठी अनेक पक्ष्यांचे जीव जातात. पशू मृत्युमुखी पडतात.
काही वर्षांपूर्वी पशू-पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती अस्तित्वात असल्याने त्यांच्या किलबिलाटाने मन प्रसन्न होत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. याचाच परिणाम म्हणून शासनाला पशू-पक्ष्यांच्या संवर्धनासाठी विशेष दिवस साजरे करावे लागत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या ‘चिमणी दिना’ला शाळा, महविद्यालयीन विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. पक्ष्यांना दाणा-पाणी देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. मात्र, निसर्गाचे हे धन खरेच जपायचे असेल तर पशू-पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय समाजातील प्रत्येक घटकाने आवर्जुन करावी. केवळ दिन साजरा करण्यापुरते याचे महत्त्व राहू नये. यासाठी समाजजागृती करणे महत्वाचे आहे.
वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असले तरी अधिकाऱ्यांच्या वातानुकूलित दालनात होणारे निर्णय हे खऱ्या अर्थाने मुक्या पशू-पक्ष्यांसाठी लाभदायक ठरणारे आहेत काय, हा संशोधनाचा विषय आहे. भावी पिढीला चिमणी, कावळा यांसारख्या पक्ष्यांची ओळख केवळ पुस्तकातून करून द्यावी लागणार नसेल तर या पशू-पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आवर्जून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. आता यासाठी खऱ्या अर्थाने जनजागृती करण्याची वेळ आली आहे. स्वत:पासून याची सुरुवात करायला हरकत नाही.

पक्षीप्रेमींनी पुढाकार घ्यावा
हल्ली उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची त्राही होत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींनी त्यांच्या संगोपणासाठी पुढाकार घ्यावा. शक्यतो घराच्या आसपास मातीच्या पात्रात पाणी व काही धान्य ठेवावे. बगिच्यात किंवा जेथे अधिक झाडे असतील अशा ठिकाणी टाकाऊ वस्तूपासून निर्मित केलेले जलपात्र टांगून ठेवावे. यात पाणी व धान्य राहील अशी सोय करावी. बाजारात सहजपणे अशी पात्रे उपलब्ध आहे. गरज आहे ती पक्षी जगविण्याची.

जंगलातील जलसाठ्यात पाणी असावे, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक पाणवठ्यांचे स्त्रोत, सोलरवरील हातपंप आदींचा वापर केला जात आहे. पशू, पक्ष्यांचे जीव वाचविणे हे वनविभागाचे कर्तव्य आहे.
- हेमंत मीणा,
उपवनसंरक्षक, अमरावती

Web Title: Animal-Birds Art Call for Flame!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.