पशुसंवर्धन शेतकऱ्यांचे एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:05 PM2018-07-21T23:05:58+5:302018-07-21T23:06:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभाग एटीएम कार्डसारखे काम करीत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून आपली समृद्धी साधावी, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी येथे शनिवारी केले.
मोर्शी येथे तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे लोकार्पण ना. जानकर यांच्या हस्ते पार पडले. मोर्शी मतदारसंघात शासकीय डेअरी महाविद्यालयात सुरू करणार असून, लवकरच पार्डीत पिंपळखुटा (मोठा) या रस्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेले शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय साकारणार आहे. चिंचोली गवळी येथे लवकरच पशुचिकित्सालय केंद्र स्थापन करण्यात येणार असून, चारायुक्त शिवारासाठी मदत मिळणार असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अनिल बोंडे होते. मंचकावर नगराध्यक्ष शीला रोडे, जि.प. सदस्य सारंग खोडस्कर, शरद मोहोड, वासुदेव सुरजुसे, प्रादेशिक मत्स्य आयुक्त शिकरे, डॉ. गोहत्रे, डॉ. साधना घुगे, अजय आगरकर, डॉ. वसुधा बोंडे, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रूपेश मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते.