अवैध कत्तलखान्यांतून जनावरे गायब; कुलूप ठोकू न संचालक पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:00 PM2019-03-11T23:00:59+5:302019-03-11T23:01:22+5:30
महापालिका हद्दीत लालखडी भागात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमध्ये सोमवारी पोलिसांनी धाडसत्र राबविले. मात्र, तत्पूर्वी कत्तलीसाठी आणलेले गोवंश गायब करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. या कत्तलखान्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप ठोकले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका हद्दीत लालखडी भागात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमध्ये सोमवारी पोलिसांनी धाडसत्र राबविले. मात्र, तत्पूर्वी कत्तलीसाठी आणलेले गोवंश गायब करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. या कत्तलखान्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप ठोकले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
‘लोकमत’ने सोमवारी ‘लालखडीत अवैध कत्तलखाने’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलिसांची एकच तारांबळ उडाली. सकाळी ११ नंतर पोलिसांनी लालखडी भागात अवैध कत्तलखान्यांची शोधमोहीम चालविली. मात्र, अवैध कत्तलखान्यांचे संचालकांनी शहरातून पोबारा केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांच्या सर्चिंगमध्ये लालखडी भागात दोन अवैध कत्तलखाने निदर्शनास आले. परंतु, ते दोनही बंद होते. सोमवारी लालखडी भागात अचानक पोलिसांची वर्दळ दिसून आल्याने स्थानिक नागरिकसुद्धा अवाक् झाले होते.
काय करीत आहे नागपुरी गेट पोलीस प्रशासन?
नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या लालखडी परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध कत्तलखाने सुरू आहेत. याची साधी कल्पनाही नागपुरी गेट पोलिसांना नाही. लालखडी परिसरातील अवैध कत्तलखान्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतरच नागपुरी गेट पोलिसांना ‘जाग’ आली, याचे आश्चर्य मानले जात आहे.
लालखडी भागातील माहिती जाणून घेण्यासाठी सोमवारी पोलिसांची चमू पाठविली होती. परंतु, अकबरनगरातील त्या कारखान्यांना कुलूप होते. नेमके आतमध्ये काय चालते, हे लक्षात आले नाही. मात्र, तेथील हालचालींवर पाळत ठेवून आहोत.
- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, नागपुरी गेट ठाणे