अंजनगाव सुर्जीत अवैध लाकूड कटाईला उधाण
By admin | Published: February 2, 2017 12:08 AM2017-02-02T00:08:26+5:302017-02-02T00:08:26+5:30
अंजनगाव सुर्जी येथे अवैध लाकूड कटाईला उधाण आले आहे. परवानगीविना आणले गेलेले लाकूड खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले जात आहे.
खुल्या जागेवर साठवण : वन विभागाची कारवाई शून्य
अमरावती : अंजनगाव सुर्जी येथे अवैध लाकूड कटाईला उधाण आले आहे. परवानगीविना आणले गेलेले लाकूड खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले जात आहे. तरीही हे लाकूड ताब्यात घेण्यासाठी वनविभाग का कारवाई करीत नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी अवैध वृक्षतोड, विक्रीला पूर्णपणे विराम लावण्याचा संकल्प घेतला आहे. मात्र, मीणा यांच्या संकल्पाला वनाधिकारी छेद देत असल्याचे वास्तव आहे. परतवाडा येथे दोन दिवसांपूर्वी खुल्या जागेवर अवैध लाकूड साठवून ठेवल्याप्रकरणी आरागिरण्यांवर धाडसत्र राबवून लाकूड ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे. परतवाड्यात बुधवारी सकाळी ८ वाजतापासून वनविभागाच्या चमुने आरागिरण्यांमध्ये लाकूड तपासणीचे सत्र चालविले आहे. परंतु अंजनगाव सुर्जी येथील अजीजपुरा परिसरात कडूनिंब, आंबा, महारुख, गोंदण, काटसावर आदी प्रजातींचे लाकूड साठवून ठेवण्यात आले आहे. तसेच ताज सॉ-मिलच्या मागील बाजूला सुमारे २०० टन आडजात लाकूड नियमबाह्यरित्या साठवून ठेवले आहे. अंजनगाव सुर्जीत परवानगीविना लाकूड आणले जात असताना वनविभागाला ते दिसू नये, ही आश्चर्यकारक बाब मानली जात आहे. अवैध लाकू ड व्यवसायासाठी वनविभाग जबाबदार असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
अंजनगाव सुर्जी परिसरात मेळघाटातून सागवानाची तस्करी केली जाते. अंजनगाव सुर्जी परिसर अवैध लाकूड व्यवसायासाठी प्रसिद्ध असून येथे आरागिरण्यांची संख्या अधिक आहे. नदीकाठी लाकूड साठवून ठेवण्याचा प्रकार अधिक आहे.
आरोपींना अटक कधी?
आरागिरणी मालक, लाकूड तस्करांनी खुल्या जागेवर अवैध लाकूड साठवून ठेवण्याची शक्कल लढविली आहे. खुल्या जागेवरील लाकडाची मालकी वनविभाग सिद्ध करु शकत नाही. मात्र, खुल्या जागेवर लाकूड कोणाचे याची इत्यंभूत माहिती संबंधित वनाधिकाऱ्यांकडे असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अधिकच बिकट स्थिती आहे.