अंजनगाव पंचक्रोशीतील तलाव, विहिरी कोरड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:01 PM2019-03-18T23:01:29+5:302019-03-18T23:01:49+5:30
अंजनगाव बारी परिसरातील पाण्याचे प्रमुख स्रोत कोंडेश्वर तलाव, गंभीवीर तलाव तसेच कोंडेश्वर येथील विहीर कोरडी झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भिवापूर तलावात विहीर खोदून त्यावर पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
साहेबराव राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव बारी : अंजनगाव बारी परिसरातील पाण्याचे प्रमुख स्रोत कोंडेश्वर तलाव, गंभीवीर तलाव तसेच कोंडेश्वर येथील विहीर कोरडी झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भिवापूर तलावात विहीर खोदून त्यावर पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
अंजनगाव बारी ग्रामपंचायतीने जलस्वराज योजनेमार्पत आठ कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात केली आहे. हे पाणी भिवापूर तलावावरून आणले जाणार आहे. यासाठी पाइप लाइनचे काम सुरू असून, नवीन टाकी व फिल्टरची कामे सुरू आहेत. गावात नवीन पाइप लाइन टाकण्यात येत आहे.
येत्या दोन वर्षांत या योजनेतून मुबलक पाणी उपलब्ध होईल. प्रत्येक घरी नळ कनेक्शन देऊन मीटर बसविण्यात येणार आहे. ही कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला.
पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुर्दशा
गावातील संपूर्ण सिमेंट रोड २५ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर तयार झाले. नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी हे रस्ते खोदावे लागले. त्यामुळे संपूर्ण गावातील रस्त्यांवर माती-चिखल पसरून हे रस्ते मातीचेच झाले आहेत, शिवाय वर्दळीमुळे वाहन अपघाताचा धोका वाढला आहे.
पाण्याची सुविधा गावासाठी महत्त्वाची आहे. पाइप लाइन टाकणे झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित करून देऊ.
- मंदा कळंबे,
सरपंच, अंजनगाव बारी