राज्यात ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 03:38 PM2018-01-24T15:38:56+5:302018-01-24T15:42:45+5:30
राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी जाहीर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी उशिरा जाहीर केला. ५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू होऊन २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीपासून संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने १० जानेवारीला जाहीर केला होता. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध झाली. त्याचे एक दिवसपूर्व आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणुुकीची नोटीस २५ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागविणे व सादर करणे, १२ फेब्रुवारीला अर्जांची छाननी, १५ फेब्रुवारीला उमेदवारी मागे घेणे, १५ फेब्रुवारीला चिन्ह वाटप, यादी प्रसिद्ध करणे, २५ फेब्रुवारीला मतदान व २६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
यावेळी आरक्षित जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. यापूर्वी सहा महिन्यांची मुदत दिली जायची. यावेळी मात्र, ही सुविधा नाकारल्यामुळे पुन्हा अनेक पदे रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज व शपथपत्र पारंपरिक पद्धतीनेच सादर करण्याची मुभा आयोगाने दिली आहे. यावेळी कोकण विभागात ४२, नाशिक विभागात ७५, पुणे विभागात १३२, औरंगाबाद विभागात ३५, अमरावती विभागात ११, तर नागपूर विभागात २२ अशा एकूण ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये सरपंचपदाची थेट जनतेमधून निवडणूक होणार आहे.
जिल्हानिहाय पोटनिवडणुका असणाऱ्या ग्रामपंचायती
राज्यात ४,१०२ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त सदस्यपदांसाठी निवडणुुका होत आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात ७८, पालघर ६५, रायगड १६५, रत्नागिरी २६३, सिंधुदुर्ग ८०, नाशिक २७८, धुुळे ८४, जळगाव १३२, नंदूरबार ४१, अहमदनगर १२८, पुणे २७४, सोलापूर ११७, सातारा ४२७, सांगली ४२, कोल्हापूर १०९, औरंगाबाद ७३, बीड ४६, नांदेड १८९, परभणी ७३, उस्मानाबाद ७३, जालना ७८, लातूर ११०, हिंगोली ७९, अमरावती १३०, अकोला ९४, यवतमाळ २०६, वाशिम ५६, बुलडाणा १०६, नागपूर ६४, वर्धा ५६, चंद्रपूर ११४, भंडारा ३२, गोंदिया ६५ व गडचिरोली जिल्ह्यातील २०७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.