Maharashtra Election 2019 : आघाडीच्या जाहीरनाम्यात चंद्रावर प्लॉट देणेच बाकी- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 07:22 PM2019-10-12T19:22:19+5:302019-10-12T19:24:10+5:30
आघाडीने जाहीरनाम्यात जगातील सर्वच आश्वासने देऊन टाकली. फक्त ताजमहाल बांधून देऊ किंवा चंद्रावर प्लॉट देऊ, एवढेच काय ते राहून गेले आहे.
दर्यापूर : आघाडीने जाहीरनाम्यात जगातील सर्वच आश्वासने देऊन टाकली. फक्त ताजमहाल बांधून देऊ किंवा चंद्रावर प्लॉट देऊ, एवढेच काय ते राहून गेले आहे. पाच वर्षांत सर्वच प्रश्न सुटले किंवा शिल्लकच नाहीत, असा दावा आपण करणार नाही; मात्र आघाडी सरकारने १५ वर्षांत काय कामे केलीत, याचा हिशेब द्यावा, आम्ही पाच वर्षांचा हिशेब देतो, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते शनिवारी स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली. या निवडणुकीत कुठेही चुरस राहिलेली नाही. लहान मुलांना जरी विचारले तरी ते सांगतील की, महाराष्ट्रात भाजप-सेना महायुतीचेच सरकार येणार आहे. जागा २२० की २४० हाच प्रश्न आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसची अवस्था राहुल गांधींना ज्ञात आहे. कितीही डोके आदळले तरी आपल्याला महाराष्ट्रात जागा मिळत नाहीत. म्हणून ते बँकॉकला निघून गेले आहेत. त्यांना राज्यात तोंड दाखवायलाही जागी उरली नसल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष खाली होण्याच्या मार्गावर आहे. मैदानात आता कोणी राहिले नाही. आमचे पैलवान तेल लावून आहेत. आता भारतीय जनता पक्षाला स्पर्धकच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
५० लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. पात्र शेतक-यांना जोपर्यंत लाभ मिळणार नाही, तोपर्यंत योजना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडीने शेतक-यांना १५ वर्षांमध्ये २० हजार कोटींचे अनुदान दिले. आम्ही पाच वर्षांत ५० हजार कोटींचे अनुदान शेतक-यांना दिले आहे. राज्यातील १४० प्रकल्पांचे कामे पाच वर्षांत पूर्णत्वास गेल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे व उमेदवार उपस्थित होते.
------------------
तापी रिचार्जमुळे सिंचनाची सुविधा
जिल्ह्यातील तापी मेघा रिचार्ज प्रकल्पासाठी सहा हजार कोटींच्या आराखड्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प समोर जाईल. यामुळे शेतक-यांना सिंचनाची मोठी सोय होणार आहे. खारपाणपट्ट्यालाही सिंचनाचा लाभ होणार असल्याचा उल्लेख करीत, दर्यापूर तालुक्यातील तब्बल 1700 शेततळी पूर्ण झाली आहेत; राज्यात दर्यापूर तालुक्याने रेकॉर्ड केला असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.