महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर
By admin | Published: August 21, 2016 11:57 PM2016-08-21T23:57:47+5:302016-08-21T23:57:47+5:30
महापालिकेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपत असून तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या ....
प्रारुप प्रभागरचना ७ सप्टेंबरला : अंतिम अधिसूचना २१ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार
अमरावती : महापालिकेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपत असून तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचे वेळापत्रक जारी केले आहे. ७ सप्टेंबर ते २१ नोव्हेंबर २०१६ दरम्यान निवडणूक कार्यक्रम राबविला जाणार आहे.
शासनाने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रारूप प्रभागरचना पद्धत लागू करण्याबाबत १९ मे २०१६ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश काढून अधिनियमात दुरूस्ती केली आहे. त्यानुसार महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेऊन जास्तीत जास्त चार सदस्यांचे प्रभाग करावयाचे आहेत. सर्व प्रभागात चार सदस्य होत नसल्यास एक प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा होईल. अथवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे होतील, अशी रचना करण्याचा सूचना आहेत.
आरक्षण निश्चितीकरिता १३ जून २०१६ रोजी नियम- २०१६ पारित केले आहे. त्यानुसार आरक्षित प्रभाग निश्चित करण्याची कार्यवाही महापालिका आयुक्तस्तरावर करावयाची आहे. प्रारूप प्रभागरचना करणे, सोडत काढणे, प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागविणे, अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे आदी कार्यवाही महापालिका प्रशासनाला करावी लागेल, असे राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि.ज.वागळे यांनी कळविले आहे. बृहन्मुंबई वगळता ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या महापालिकांसाठी हा कार्यक्रम लागू करण्यात आला आहे.
अमरावती मनपात ८७ सदस्य संख्या असून ४३ प्रभाग आहेत. त्यानुसार प्रभागरचना करण्याची तयारी करावी लागणार आहे. यावेळी प्रभागाचे सीमांकन राज्य निवडणूक आयोग ‘गुगल मॅपिंग’ने करणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा वेळ वाचणार आहे. सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)
निवडणूक कार्यक्रम
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींकरिता आरक्षित प्रभाग निश्चिती-७ सप्टेंबर २०१६
प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव आरक्षण तपासणी करुन निवडणूक आयोगाला पाठविणे- १२ सप्टेंबर २०१६
प्रारुप प्रभागरचनेच्या आरक्षण प्रस्तावास मान्यता देणे- २३ सप्टेंबर २०१६
ओबीसी महिला, पुरुष प्रवर्ग सोडत काढण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे- ४ आॅक्टोबर २०१६
ओबीसी महिला, पुरुष प्रवर्ग सोडत काढणे- ७ आॅक्टोबर २०१६
प्रारुप प्रभागरचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे- १० आॅक्टोबर २०१६
प्रारुप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविणे १० ते २५ आॅक्टोबर २०१६
प्रारुप प्रभागरचनेबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी- ४ नोव्हेंबर २०१६
प्रारुप प्रभागरचनेबाबत प्राप्त हरकती व सूचना निवडणूक आयोगाकडे सादर करणे- १० नोव्हेंबर २०१६
प्रारुप प्रभागरचनेबाबत प्राप्त हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करुन निर्णय देणे- २२ नोव्हेंबर २०१६
प्रभागरचनेच्या अधिसूचना व नकाशामध्ये योग्य ते बदल करुन प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे- २५ नोव्हेंबर २०१६