स्क्रब टायफसचे आणखी दहा रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:10 PM2018-09-08T22:10:37+5:302018-09-08T22:11:14+5:30
जिल्ह्यात स्क्रब टायफस या जीवघेण्या आजाराचे रूग्णालयात आणखी ९, तर वरुड तालुक्यात १ रूग्ण आढळले आहेत. आता स्क्रब टायफसच्या पॉझिटिव्ह व संशयित रूग्णांची संख्या ३० वर पोहचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात स्क्रब टायफस या जीवघेण्या आजाराचे रूग्णालयात आणखी ९, तर वरुड तालुक्यात १ रूग्ण आढळले आहेत. आता स्क्रब टायफसच्या पॉझिटिव्ह व संशयित रूग्णांची संख्या ३० वर पोहचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये आठ रूग्ण राजापेठ येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये डॉ.मनोज निचत यांच्याकडे उपचार घेत आहेत. सदर रूग्ण हे चार दिवसांतील असल्याने स्क्रब टायफसची वाढती संख्येमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
यापूर्वी येथील पीडीएमसी हॉस्पिटलमध्ये ६ रूग्ण आढळले होते. खासगी डॉक्टारांकडे उपचार घेणाऱ्या सात रूग्णांना नागपूर येथे उपचारासाठी हलविले होते. यापैकी अनेकांचे रक्त नमुने तपासणीत इलायझा कनर्फम फॉर स्क्रब टायफस चाचणी पॉझिटिव्ह आली. स्क्रब टायफस आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेत सदर चाचणी झाली होती. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने सदर रक्तनमुने घेऊन ते जीएमसी नागपूर येथे तपासणीसाठी पाठविले. मात्र इलायझा कनर्फम ही चाचणी महागडी असल्याने काही डॉक्टरांनी स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यानंतर आयजीएम चाचणीनंतर उपचार सुरू केले.
या गावांतील आहेत रूग्ण
साई नगर अमरावती १, पिंपळगव्हाण ता. नांदगाव खंडेश्वर १, बेरोळा ता. नांदगाव खंडेश्वर १, घुईखेड ता. चांदूररेल्वे १,लाडेगाव ता. कारंजा १, रामा साऊर ता. भातकुली १, नांदगाव खंडेश्वर १, पोहरा ता. अमरावती १, बग्गी जवरा ता. चांदूररेल्वे १, आमला ता. चांदूररेल्वे १ या भागामध्ये नवीन स्क्रब टायफसचे रूग्ण आढळून आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पुसला, जामगाव येथेही आढळले स्क्रब टायफसचे रुग्ण
वरूड : तालुक्यातील मांगरुळी येथे स्क्रब टायफसने पंकज श्रीराव या ३५ वर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासनाला जाग आली. सर्वेक्षणासह पत्रके वाटून जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. वरूडच्या एका खासगी दवाखान्यात पुसला येथील दोन रुग्णांच्या रक्तचाचण्या स्क्रब टायफस पॉझिटिव्ह आल्याने ते उपचार घेत आहेत. ग्रामीण रुग्णलयात जामगाव (खडका) येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला नागपूरला उपचारार्थ पाठविण्यात आले. अशाप्रकारचे अनेक रुग्ण तालुक्यात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या आजाराची सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधोपचार उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी दिला आहे.
स्क्रब टायफसचे आणखी आठ रूग्ण आढळले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या १३ पैकी ११ रूग्णांची इलायझा कर्न्फम झाले असून दोन रुग्ण संशयित आहेत.
- मनोज निचत,
एमडी मेडिसीन, अमरावती
गवतांवर व झाडांवर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. आजार नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू आहे. उपजिल्हा रूग्णालयाच्या अधिक्षकांना सर्तकतेच्या इशारा दिला आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक