आणखी २१ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:26 AM2018-10-05T01:26:37+5:302018-10-05T01:27:18+5:30
जिल्ह्यात आणखी २१ डेंग्यूरुग्ण आढळून आले आहेत. साईनगर परिसरातील दोघे भावांना डेंग्यूचे निदान झाले. अमरावती व बडनेरा परिसरात सर्वाधिक डेंग्यूरुग्ण आढळून आले असून, आरोग्य प्रशासनाचे स्वच्छता अभियान थंडावल्यामुळे घरोघरी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात आणखी २१ डेंग्यूरुग्ण आढळून आले आहेत. साईनगर परिसरातील दोघे भावांना डेंग्यूचे निदान झाले. अमरावती व बडनेरा परिसरात सर्वाधिक डेंग्यूरुग्ण आढळून आले असून, आरोग्य प्रशासनाचे स्वच्छता अभियान थंडावल्यामुळे घरोघरी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
डेंग्यूचे थैमान थांबविण्यासाठी पुन्हा सक्षमपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे झाले असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. राजापेठ येथील डॉ. राजेश मुंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपुर्वी ते दाखल झाले. साईनगर परिसरातील रहिवासी २९ व २७ वर्षीय दोेन भावांना डेंग्यूची लागण झाली आहे. लहान भावाच्या रक्तातील पांढऱ्या पेशी २९ हजारावर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजापेठ परिसरातील ५० वर्षीय महिलेला डेंग्यू झाला आहे, तर कारंजा लाड येथून १६ वर्षाचा मुलगा उपचारासाठी दाखल झाला आहे. गोपालनगरातील ३४ वर्षीय पुरुष डेंग्यूने बाधित असून, त्यांच्या रक्तातील पांढºया पेशीसुद्धा २९ हजारांपेक्षा कमी असल्याने सतर्कतेने उपचार सुरू आहे. राजापेठ येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये पाच नवीन डेंग्यूरुग्ण दाखल झाले. यामध्ये साईनगर परिसरातील ३२ वर्षीय महिला, पन्नालालनगर येथील ३५ वर्षीय महिला, लाडेगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, गणेश कॉलनी येथील १९ वर्षीय मुलगी, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव येथीेल १६ वर्षीय मुलगी आहे. डॉ. पंकज बागडे यांच्या हॉस्पिटलमध्ये पाच डेंग्यूरुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात १८ वर्षीय मुलगा (धामणगाव रेल्वे), ६० वर्षीय महिला (उत्तमनगर), हर्षराज कॉलनीतील दोन व यशोदानगरातील एक रुग्ण आहे. डॉ. हरीश बाहेती यांच्या हॉस्पिटलमध्ये बडनेरा येथील ६५ वर्षीय महिला, राजापेठ येथील १९ वर्षीय मुलगा यांना उपचाराअंती सुटी देण्यात आली.
डॉ. संदीप मलिये यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांत १५ वर्षीय मुलगा (अमरावती), ४५ वर्षीय महिला (फरशी स्टॉप), २४ वर्षीय मुलगा (अर्जुननगर) दाखल आहेत. मागील आठवड्यात डेंग्यूने धामणगाव येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता तरुणाचा पुणे येथे उपचारदरम्यान मृत्यू झाला.
स्वच्छता मोहीम राबविणे सुरूच आहे. ती आता पुन्हा सक्षमपणे राबविण्यात येणार आहे. फॉगिंग मशीनद्वारे धूरळणीसुद्धा करण्यात येणार आहे. नागरिकांनी ताप अंगावर काढू नये. सर्तकता बाळगून तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा.
- संजय निपाणे, आयुक्त महापलिका, अमरावती
पाच डेंग्यू रुग्णांवर उपचार सुरू असून, दोन रुग्णांच्या शरीरातील पांढºया पेशी या २९ हजार आहेत. दररोज दोन ते तीन डेंग्यूरुग्ण येत आहेत.
- डॉ. राजेश मुंदे, एमडी मेडिसीन, अमरावती.