मेळघाटातील दुसऱ्याही मृत लांडग्याला रेबीजच; बंगळुरु प्रयोगशाळेचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 07:54 PM2021-11-27T19:54:35+5:302021-11-27T19:55:27+5:30

Amravati News धारणी तालुक्यात आठ जणांना चवताळून चावा घेणाऱ्या दुसऱ्या मृत लांडग्यालादेखील रेबीज झाल्याचा अहवाल बंगळुरु येथील प्रयोगशाळेने दिला आहे.

Another wolf in Melghat died by rabies; Bangalore Laboratory Report | मेळघाटातील दुसऱ्याही मृत लांडग्याला रेबीजच; बंगळुरु प्रयोगशाळेचा अहवाल

मेळघाटातील दुसऱ्याही मृत लांडग्याला रेबीजच; बंगळुरु प्रयोगशाळेचा अहवाल

Next
ठळक मुद्देजंगलात १४ ट्रॅप कॅमेरे, वाघांना वाचविण्यासाठी चवताळलेल्या प्राण्यांची शोधमोहीम

अमरावती : धारणी तालुक्यात आठ जणांना चवताळून चावा घेणाऱ्या दुसऱ्या मृत लांडग्यालादेखील रेबीज झाल्याचा अहवाल बंगळुरु येथील प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वनविभागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. चवताळलेला लांडगा वजा इतर प्राण्यांची शोधमोहीम युद्धस्तरावर मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी जंगलात १४ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत.

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील चिपोली येथे २७ आदिवासी नागरिकांना चावा घेणाऱ्या लांडग्याला संतप्त नागरिकांच्या जमावाने ठार केले होते. त्याला रेबीज झाल्याचा अहवाल बंगळुरु येथील प्रयोगशाळेतून आला होता. त्यानंतर पुन्हा शनिवारी धारणी व परिसरात चवताळलेल्या लांडग्याने आठ नागरिकांना चावा घेतला. वनविभाने शोधमोहीम राबविली असता दुसऱ्या दिवशी तो लांडगा जुटपाणी गावानजीक मृतावस्थेत आढळला होता. त्याच्यादेखील शविच्छेदन अहवालात रेबीज झाल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या अहवालानंतर वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली आहे.

गावातील कुत्री, पाणवठे तपासणी

रेबीज झालेल्या लांडग्यांचा उपद्रव व्याघ्र प्रकल्पातील वाघ व बिबट तसेच इतर वन्य प्राण्यांना होऊ नये, रेबीज त्यांच्यापर्यंत जाऊ नये, यासाठी सिपना व गुगामल वन्यजीव विभागात अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. गावातील चवताळलेल्या कुत्र्यांबाबत जनजागृतीचे आदेश दिले असल्याचे सिपना वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांनी सांगितले. पाणवठेसुद्धा लिटमस पेपरने तपासले जात असल्याचे गुगामलचे सहायक वनसंरक्षक मच्छिंद्र ठिगळे यांनी सांगितले.

 आठ टीम, २४ तास गस्त

धारणी व परिसरातील वनविभागाच्या जंगलात आठ चमूंकडून प्रत्येकी सहा तास गस्त घातली जात आहे. आदिवासी गावकऱ्यांमध्ये कँपेनिग, कॉल आल्यावर त्वरित कारवाई करून शोधमोहीम सुरू आहे.

दुसऱ्या लांडग्याचा प्रयोगशाळेतील अहवालसुद्धा रेबीज पॉझिटिव्ह आला आहे. आठ चमूकडून प्रत्येकी सहा तास रात्रंदिवस गस्त सुरू आहे. १४ ट्रॅप कॅमेरे जंगलात लावण्यात आले आहे.

- शुभांगी डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुसर्दा/धूळघाट रेल्वे (ता. धारणी)

Web Title: Another wolf in Melghat died by rabies; Bangalore Laboratory Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.